होय, आम्ही नरभक्षीच मारला!
By admin | Published: August 23, 2014 01:41 AM2014-08-23T01:41:11+5:302014-08-23T01:41:11+5:30
१९ आॅगस्टच्या सायंकाळी गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता. त्याची पूर्णत: आोळख पटली ...
चंद्रपूर : १९ आॅगस्टच्या सायंकाळी गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता. त्याची पूर्णत: आोळख पटली असून त्याचे यापूर्वीचे व्हिडिीओ फुटेज, छायाचित्रे आणि पुरावेही आपल्याकडे आहेत, असा दावा वन विभागाने केला आहे. वन विभागाच्या या दाव्यानंतरही तो वाघ नरभक्षी होता की नव्हता यावर अजूनही खल सुरूच असल्याने हा वाद एवढ्या लवकर शमेल, याची खात्री राहिलेली नाही.
उपवनसंरक्षक संजय ठाकरे यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठार झालेल्या वाघाची छायाचित्रे सादर केली. आपल्या आईसोबत असलेल्या वाघाच्या दोन बछड्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ फुटेज त्यांनी सादर केले. अडीच वर्षांपूर्वीच्या या छायाचित्रात दिसणाऱ्या त्या बछड्यांपैकीच नर असलेल्या वाघाने पोंभूर्णा परिसरात सात व्यक्तींवर हल्ले करून ठार केले. त्याची ओळखही वाघाच्या शरीरावर असलेल्या पट्ट्यांरून पटल्याचा दावा यावेळी संजय ठाकरे यानी केला.
वाघाने सहा घटनांमध्ये केलेल्या हल्ल्यातील पगमार्कही जुळत असल्याचा दावा संजय ठाकरे यांनी यावेळी केला. वाघाला मारण्यापूर्वी त्याची ओळख पटविणे महत्वाचे होते. या वाघाच्या मानेजवळ असलेले पट्टे आणि चेहऱ्यावर असलेला रंग ही त्याची स्वतंत्र ओळख होती. एवढेच नाही तर माणसाला मारल्यावर अंगावर बसून पे्रताचे लचके तोडण्याची त्याची पद्धत होती. सातपैकी सहाही घटनांमध्ये हे साम्य आढळले. नागरिकांचीही वाघाला ठार करण्याची वाढती मागणी होती. वाघाचे वाढते हल्ले लक्षात घेता, रविवारी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांनी वाघाला दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघाला ठार न करता बेशुद्ध करता आले असते, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, १९ आॅगष्टच्या सायंकाळी अंधार पडायला आल्याने ट्रॅक्यूलाईन करणे शक्य नव्हते. त्याला पुन्हा मोकळे सोडले असते तर माणसांवर हल्लाची नवी घटना घडण्याचा धोका होता. टॅ्रक्यूलाईन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरल्याने गोळ्या झाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाजू ठाकरे यांनी मांडली. (जिल्हा प्रतिनिधी)