योगगुरु रामदेवबाबा शुक्रवारपासून मूल शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:03 AM2018-01-22T00:03:17+5:302018-01-22T00:03:43+5:30
योग, आयुर्वेद आणि स्वदेशी वस्तूंवर योगगुरु रामदेव बाबा यांचे काम झपाट्याने सुरु आहे.
आॅनलाईन लोकमत
मूल : योग, आयुर्वेद आणि स्वदेशी वस्तूंवर योगगुरु रामदेव बाबा यांचे काम झपाट्याने सुरु आहे. परंतु, येत्या काही दिवसात शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी ते काम करणार आहेत. येणारी पिढी शिक्षित झाली पाहिजे, तरच भविष्यात भारत सुजलम्-सुफलम् बनेल. नागरिकांनीही योग विस्तारसाठी प्रयत्न केले पाहिजे. यामुळेच समृद्ध, संस्कारमय, स्वच्छ आणि निरोगी आरोग्य राहू शकतो, असा आत्मविश्वास पतंजली सेवा समितीच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना यांनी व्यक्त केले. त्या येथील कन्नमवार सभागृहात माध्यमांशी बोलत होत्या.
जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेव बाबा यांना येण्याची विनंती केली होती. त्यामुळे रामदेव बाबा मूल शहरात येणार असून १९ ते २२ फेब्रुवारी रोजी येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात नागरिकांना योगाचे शिक्षण देणार आहेत. यासाठी पतंजली सेवा समितीच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना मूल येथे आल्या होत्या. त्यांनी येथील कर्मवीर महाविद्यालयाचा परिसराची पाहणी केली.
योगाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने योगगुरु रामदेव बाबा चंद्रपूर, जालना आणि अक्कलकोट येथे येवून योगाचे धडे देणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून मूल येथे तीन दिवस या शिबिराचे आयोजन डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पतंजलीचे शहरध्यक्ष प्रभाकर भोयर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे अध्यक्ष अजय गोगुलवार यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठित करण्यात येणार आहेत. या शिबिरात तीन दिवस सकाळी ५ ते ७.३० पर्यंत योगाचे धडे दिले जाणार आहे. ३ ते ५ पर्यंत महिलांसाठी आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पतंजली सेवा समितीच्या राज्य प्रतिनिधी सुधा अलीमोटे, शोभा भगिया, भारती शेंडे, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरुनुले, भाजपचे जिल्हा संघटक राम लखिया, भाजपचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, न. प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे उपस्थित होते. योग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.