तुम्ही वाघ आहात, ध्येयासाठी पेटून उठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:00 PM2019-01-16T23:00:58+5:302019-01-16T23:01:38+5:30
चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. येथील वाघांनी माझे आयुष्य मी स्वत: बदलेल अशी धारणा ठेऊन स्वत:च्या आयुष्याची ब्ल्यु प्रिट तयार करावी, स्वत:वर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्यासाठी पेटून उठा, असा यशाचा मुलमंत्रच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नागरे पाटील यांनी चंद्रपूरातील तरुणाईला दिला. आपली बलशक्ती, कमतरता, फायदे व धोके ओळखा, स्वत:बद्दल विश्वास बाळगा आणि ध्येय निश्चित करा, यश तुमच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. येथील वाघांनी माझे आयुष्य मी स्वत: बदलेल अशी धारणा ठेऊन स्वत:च्या आयुष्याची ब्ल्यु प्रिट तयार करावी, स्वत:वर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्यासाठी पेटून उठा, असा यशाचा मुलमंत्रच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नागरे पाटील यांनी चंद्रपूरातील तरुणाईला दिला. आपली बलशक्ती, कमतरता, फायदे व धोके ओळखा, स्वत:बद्दल विश्वास बाळगा आणि ध्येय निश्चित करा, यश तुमच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.
मिशन सेवा अंतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथ स्पर्धा महोत्सव कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी त्यांनी चंद्रपुरातील युवकांशी हृदय संवाद साधला. कार्यक्रमाचे उद्घाटन वित्त नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे, सीजीएसटी मुंबईचे सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे, लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर, अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपवनसंरक्षक गजेंद्र अहिरे, बांबू संशोधन परीक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्याचे संकेत मिळताच, मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांची एक ते दीड महिना पाहणी करीत काय, कुठे व कसे करायचे याबाबतचे नियोजन केले. त्याद्वारे ताज हॉटेल परिसरातील हातठेलेवाल्यांना मनपा प्रशासनाच्या सहाकार्याने इतरत्र हलविले. २६ नोव्हेंबरच्या दिवशी हॉटेलमध्ये तीन अतिरेक्यांकडून अंधाधुंद गोळीबार सुरु असताना योग्य नियोजन करीत हॉटेलच्या मागील दरवाज्यातून प्रवेश करुन अतिरेकी हल्ला परतवून लावला. या सर्व बाबी नियोजनातून शक्य होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजन करुन अभ्यास करावा.
कष्टाला शॉर्टकट नसते-पाटील
अभ्यासासाठी किंवा मार्गदर्शनासाठी दिल्ली, पुणे येथे जाऊन महागडे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. ई-लर्निग, इंटरनेट, ई-बुकच्या माध्यमातून अभ्यास करा. कष्टाला कुठलेही शॉर्टकट नाही, असे प्रतिपादन कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी केले.
नागरे म्हणाले, आपणाला काय वाचायचे आहे. यापेक्षा काय वाचू नये, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी समूह चर्चेद्वारा अभ्यास करा, शांंततेच्या कामात घाम गाळल्यास नंतरचे काम सोपे होते. पहाटेच्या सुमारास शांतता राहत असल्याने त्यावेळचा अभ्यास सरळ मेंदूत जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी अभ्यास करण्याचे नियोजन करा, यशाची उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल टाकणे गरजचे असते. आपले जीवन हे परिपूर्ण आहे. प्रत्येक वेळचे आयुष्य वेगळे असते. जन्म कोणत्या कुळात घेतला, हे आपल्या हातात नसले तरी पुरुषार्थ घडविणे आपल्या हातात आहे. जिद्द, प्रबळ इच्छाशक्तीने प्रयत्न करा, त्यासाठी नियोजन व प्लॉन करणे गरजेचे आहे. आपला शत्रू, धोका, कमतरता आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा, असेहीे त्यांनी सांगितले.
नेटवर फालतू वेळ घालवू नका
सद्यस्थितीत युवक इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. मात्र युवकांनी नेटचा वापर जपून करावा, नेटवर उपलब्ध साहित्यांचा वापर करुन अभ्यास करावा, नेटवर फालतू वेळ घालवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार, योगा व व्यायाम करावे, असे आवाहनही विश्वास नागरे पाटील यांनी केले.
युवा मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करा, मी ताकदीनिशी तुमच्या पाठीशी - मुनगंटीवार
चंद्रपूर ही भूमी एकलव्याची आहे. या ठिकाणी फक्त मार्गदर्शन करणाऱ्या द्रोणाचार्यांची गरज आहे. त्यासाठी विश्वास नागरे पाटील यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे. त्यांच्या वाणीतून, विचारातून युवकांनी प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा गड जिंकावा. एकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील. यशासाठी पूर्ण ताकतीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या असेल, त्यासाठी आपण राज्याचा वित्तमंत्री म्हणून पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहणार, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जेव्हा ब्रिटीश सरकारला भारत छोडोचा इशारा देण्यात आला, त्या आंदोलनात लक्षणीय सहभाग देणारा चंद्रपूर जिल्हाच होता. १९४२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने क्रांतीज्योत प्रज्वलित करणारा चंद्रपूर जिल्हाच होता. मिशन शौर्यच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टवर चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकविला. आता स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरणाºया विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय राहावे, यादृष्टीने मिशन सेवा यशस्वी करा, असे आवाहनही राज्याचे अर्थ व नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ही पराक्रमाची भूमी आहे. या ठिकाणी पराक्रमाचा इतिहास आहे. जिल्ह्यातून अनेक गुणवान तयार झाले आहेत. ही संख्या वाढविण्याचे आपले ध्येय आहे, असेही ते म्हणाले. निवडक सहा क्रीडाप्रकारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आॅलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सिद्ध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान हेदेखील यासाठी चंद्रपूरमध्ये येणार असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.