संकरीत गायीचेच दूध प्यावे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:00 AM2021-12-15T05:00:00+5:302021-12-15T05:00:38+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय होय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात देशी गायींची संख्या कमी होत असून संकरित गायी पालनाचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे नागरिकांना संकरित गायीचेच दूध प्यावे लागणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी, अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या. दुग्धोत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातींचा वापर करावा लागला. यातूनच आता शेती व्यवसाय सहज जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुधाचा व्यवसाय सुरू झाले. पण, देशी गायी कमी दूध देत असल्याने संकरित गायी पालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. जि. प. पशूसंर्वधन विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या दुग्ध विकास योजनांची अंमलबजावणी करीत आसल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
ब्रह्मपुरीत म्हशींची संख्या अधिक
- ब्रह्मपुरी तालुका धान उत्पादनात अग्रेसर आहे. या तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार ८ हजार ९६५ म्हैस वर्गीय जनावरांची नोंद झाली. गायवर्गात २८ हजार ३४२ जनावरे आहेत. शासनाच्या योजनेमुळे शेतकरी आता दुग्ध उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून हा तालुका दूध उत्पादनातही प्रगती करत आहे.
सर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यात
सर्वांत जास्त पशुधन चिमूर तालुक्यात आहे. पशुगणनेनुसार, ७२ हजार ७७५ पशुधनाची नाेंद करण्यात आली आहे. या तालुक्याला ताडोबाचे जंगल लागून आहे. शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाळू जनावरांचे पालन करत आहेत. वनकायद्यामुळे चराईच्या क्षेत्रात घट झाली, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वांत कमी पशुधन बल्लारपूर तालुक्यात
n बल्लारपूर तालुक्यात जंगलाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे; परंतु, अन्य तालुक्यांच्या तुलनेत पशुधनाची संख्या आहे.
n जि. प. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, गायवर्ग, म्हैस, मेंढी, शेळी असा वर्गातील १९ हजार ५२७ जनावरांची नोंद झाली आहे.
n पोंभूर्णा तालुक्यात म्हैस वर्गीय जनावरांची संख्या कमी आहे. या शिवाय गोंडपिपरी, जिवती तालुक्यातही प्रमाण कमी आहे.