तुम्हीच सांगा, जगायचे कसे ?
By admin | Published: July 21, 2014 11:46 PM2014-07-21T23:46:34+5:302014-07-21T23:46:34+5:30
जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस
भाजीपाल्यांचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले
चंद्रपूर : जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस रुपयांहून अंशी रुपयांपर्यंत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे गृहीणींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.
महागाईच्या विळख्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी कशी करावी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची मजुरी केवळ भाजीपाला खरेदीमध्येच जात आहे. वाढत असलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत केवळ हातमजूरी करुन आपले जीव जगणारा मजुरवर्गच आता त्रस्त झाला आहे. सध्यास्थितीत ग्रामीण भागात १०० ते १५० रुपये रोजी तर शहरामध्यये २०० ते ३०० रुपये मजूरी मिळते. मोलमजुरी करुन जीवन जगणाऱ्या मजुरांना तर, जगणे कठीण झाले आहे.
भाजीपाल्यापासून ते किराणा सामान आणता- आणता त्याची मिळालेली मजूरी आणि होणारा खर्च याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने दिवसेंदिवस चिंता वाढत आहे.
बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव आणि दररोजच्या रोजगारासाठी करावी लागणारी वणवण याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तुंटपूंज्या मिळणाऱ्या मजुरीत व जीवनावश्यक वस्तूंचा खर्च, शैक्षणिक खर्च, प्रवास आणि ऐनवेळी येणाऱ्या काही खर्चाचा हिशेब केल्यानंतर मजुरी व खर्च याचा काहीही ताळमेळ बसत नाही. शासकीय नोकरी करणाऱ्यांना दरमहिन्यात वेतन मिळते, मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा कुणी विचार करणार का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांसह मजूर वर्गातून केला जात आहे.(नगर प्रतिनिधी)