‘तुम्ही मला माझ्यावर लिहिलेला धडा दाखविला, मी तुम्हाला बॅग देतो’! पत्नीसोबत मास्टर ब्लास्टर पोहचला शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 10:07 PM2023-05-05T22:07:36+5:302023-05-05T22:08:19+5:30
Chandrapur News मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे.
राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे, शुक्रवारी सचिन व परिवाराने कोलारा कोअर गेटमधून सफारी केली. तेव्हा त्यांना छोटी तारा वाघिण व दोन अस्वलांचे दर्शन झाले. दोन महिन्यांच्या अंतराने सचिनने ताडोबात दुसऱ्यांदा भेट दिली आहे.
सचिनने दोन महिन्यांपूर्वी अलिझंजा शाळेतील विद्यार्थ्यांना भेट दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी सचिनला त्यांच्यावर लिहिलेला धडा दाखविला होता. तेव्हा सचिनने मी तुम्हाला स्कूल बॅग देतो, असे सांगितले. दिलेले वचन पाळण्यासाठी सचिन पुन्हा शुक्रवारी अलिझंजा येथील शाळेत आला. तुम्ही मला भेटण्यासाठी रस्त्यावर आला होता. आता मी तुम्हाला स्कूल बॅग देण्यासाठी शाळेत आलो, असे सांगत या बॅगमध्ये काही साहित्य आहे, तुम्हाला खूप शिकायचे आहे, असा संदेश देत सचिनने शाळेतून निरोप घेतला.
सचिन तेंडुलकर फेब्रुवारी महिन्यात पत्नी अंजलीसोबत ताडोबात सफारीसाठी आला असता अलिझंजा बफर झोन गेटमधून सफारी करताना अचानक अलिझंजा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. सचिनची पत्नी डॉ. अंजली यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचे वचन दिले होते. ते सचिन व अंजलीने पूर्ण केले. यावेळी मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षिका मनीषा बावनकर, सरपंच गजानन वाकडे, शंकर चौखे, माजी सरपंच वैशाली नागोसे, देविदास बावनकर, रवींद्र उरकुडे, वनरक्षक परमेश्वर अनकाडे आदी उपस्थित होते. सचिन ७ मेपर्यंत रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे.