तरुण व्यावसायिकानं स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘मै हार गया हु सॉरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 05:13 PM2017-10-21T17:13:17+5:302017-10-21T17:14:05+5:30

एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

The young businessman himself shot himself in suicide | तरुण व्यावसायिकानं स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘मै हार गया हु सॉरी’

तरुण व्यावसायिकानं स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘मै हार गया हु सॉरी’

Next

चंद्रपूर - एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी (21 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पदमकुमार सागरमल जैन(लोढा) (वय ४० वर्ष) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचं नाव आहे. ते स्नेहनगर वॉर्ड गजानन मंदिर परिसरातील रहिवासी होते.  मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत ‘मै हार गया हु सॉरी’ अशा आशयाचा मजकूर आढळला आहे. 

पदमकुमार हा प्रापर्टी डिलर्सचे काम करायचा.  सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पेवर्सची फॅक्टरी सुरू केली होती. मागील काही दिवसांपासून प्रापर्टीच्या कामात अपयश येत असल्यामुळे अस्वस्थ असल्याचे समजते.  मिळालेल्या माहितीनुसार, पदमकुमार हे शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्वत:ची कार घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर ते पडोली येथील हनुमान मंदिरात गेले आणि तेथे हनुमान चालिसाचे पठणही केले. तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याचे समजते. यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने घरातील मंडळींसह नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी शोध घेणे सुरू केले.

पदमकुमारचा मोबाइल सुरू असताना त्याचे लोकेशन एमआयडीसी परिसर दाखवत होते. सदर परिसरातही शोध मोहीम राबविली. मात्र शोध लागला नाही. शनिवारी सकाळी एमआयडीसी परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागील भागात कोसारा मार्गावर फिरायला गेलेल्या काही लोकांना एक कार शुक्रवारपासून एकाच जागेवर उभी आहे, असे लक्षात आले. त्यांनी वाहनाच्या काचातून डोकावून बघितले असता वाहनात पदमकुमार चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. यानंतर लगेच घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार प्रदीप गोतमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव, पो. हवा. मनोहर कांबळी, राजू लाखे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी रवाना झाला. घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी उसळली होती. पदमकुमारने परवाना असलेल्या पिस्तुलातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
 

हनुमान मंदिरात चालिसा पठण

पदमकुमार घरुन बाहेर पडल्यानंतर सरळ पडोली येथील हनुमान मंदिरात गेले. तेथे त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर मात्र शनिवारी (21 ऑक्टोबर) सकाळी त्यांचा त्यांच्याच कारमध्ये मृतदेह आढळला.

पिस्तुलातील एक गोळी गायब
पदमकुमारकडे परवाना असलेली पिस्तुल होती. त्या पिस्तुलात सहा गोळ्या होत्या. पदमकुमारचा मृत्यू एकाच गोळीने झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र पिस्तुलात चारच गोळ्या आढळून आल्यामुळे एक गोळी कुठे गायब झाली. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

20 वर्षांनी पुनरावृत्ती
सुमारे २० वर्षांपूर्वी पदमकुमारचे वडील सागरमल हे दिवाळीच्या दुसऱ्यादिवशी घरातून एकाएकी निघून गेले. तेव्हापासून ते परतलेच नाही.  यानंतर आई व लहान भावाचा सांभाळ पदमकुमारने जबाबदारीने केला. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. तब्बल २० वर्षांनी तेही दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी पदमकुमारने जगाचा निरोप घेतला. यावरून हळहळ व्यक्त होत आहे.

एसडीपीओंची जीभ घसरली
घटनास्थळी एक युवक मोबाइलमध्ये शुटींग करत असल्याची बाब उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना खटकली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग होत नसल्यामुळे त्यांनी त्याला शिवीगाळ केली. यावेळी त्यांची जीभ घरसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Web Title: The young businessman himself shot himself in suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.