वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी युवा शेतकऱ्याची अफलातून युक्ती.. शेतात लावला डीजे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 12:35 PM2021-08-09T12:35:21+5:302021-08-09T12:38:05+5:30
Chandrapur News सध्याच्या डिजिटल काळात प्राचीन गाणे कालबाह्य झाले असताना चक्क डीजेच्या तालावर रोवणी करण्याचा अभिनव प्रयोग विनोद शर्मा यांनी कोटगाव येथील शेतात केला.
रामदास हेमके
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्राचीन काळापासून शेतात मजूर काम करीत असताना मनोरंजनाचा आधार घेत होते. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत असल्याने असे मनोरंजन बंद झाले आहे. परंतु सध्याच्या डिजिटल काळात प्राचीन गाणे कालबाह्य झाले असताना चक्क डीजेच्या तालावर रोवणी करण्याचा अभिनव प्रयोग विनोद शर्मा यांनी कोटगाव येथील शेतात केला.
चिमूर येथील विनोद शर्मा यांचा कापड व्यवसाय असून त्यांनी कोटगाव येथील मित्राची शेती बटईने करून केली. त्यांनी भाताची रोवणी केली असून मिरची, तूर पिकाची लागवड केली आहे. मित्राची शेती पडीत ठेवण्यापेक्षा शेती करण्यात उत्साह दाखवत धान, मिरची, तूर पिकाचे उत्पादन घेत आहे. शेताजवळ नदी वाहत असून शेतात बोडी, बोअरवेल असल्याने २४ तास सिंचन व्यवस्था आहे. शेतात रोवणीच्या दरम्यान महिला मजूर प्राचीन गाणे म्हणतात. परंतु ते गाणे आता कालबाह्य झाल्याने शर्मा यांनी चक्क डीजे लावून रोवणी करण्याचा प्रयोग केला. यातून कोरोना काळात मजुरांचे मनोरंजन करीत मजुरांचे उत्साह वाढविला. वातावरण आनंदीमय झाले. महिला मजुरांनी खूप आनंद घेतला. रोवणी समाप्तीनंतर उसळ चिवडा देण्याची पद्धत काही शेतकरी अवलंबत असतात. परंतु विनोद शर्मा यांनी महिला मजुरांसाठी सामूहिक जेवण देत वेगळी पद्धत अंमलात आणली.
डीजेच्या आवाजामुळे वन्यप्राण्यांचीही भीती नाही
सध्या वन्यप्राण्यांचा शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. हा हंगामात अनेकजण वाघ, बिबट, रानडुक्कर, अस्वल यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. काहींचा जीवही गेला आहे. त्यामुळे शेतात जायला अनेक शेतकरी घाबरताना दिसले. मात्र डीजे लावून रोवणी केल्यामुळे डीजेच्या आवाजाने वन्यप्राणी येण्याची भीतीही शर्मा व त्यांच्या मजुरांना नव्हती.
रोवणी करणाऱ्या महिलांनी डीजेच्या गाण्यावर सकाळपासून ते रोवणी समाप्तीपर्यत खूप आनंद घेतला. प्राचीन गाणे आता कालबाह्य होत गेल्याने मजुरांचा उत्साह व आनंद घेण्यासाठी डीजेचा प्रयोग केला.
-विनोद शर्मा, युवा शेतकरी,