आईसमक्ष घरातच हातपाय बांधून तरुणाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:00 AM2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:34+5:30
अचानक रात्रीला काही संतप्त व्यक्ती नरेश गजभिये याच्या घरी चालून आले. घरात नरेशसोबत म्हातारी आई होती. आईच्या समोरच नरेशला त्याच्याच घरात पकडून हातपाय बांधले. तो पळून जाईल या भीतीने हातपाय बांधलेला दोर पलंगाला बांधला. यानंतर त्या व्यक्तींनी नरेशला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच राजुरा चांगलेच हादरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : ३० वर्षीय तरुणाची काही अज्ञात लोकांनी त्याच्याच घरात दोराने करकचून हातपाय बांधून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना राजुरा येथील रमाबाईनगर वाॅर्डात रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, ही घटना त्याच्या आईसमाेरच घडली. नरेश गजभिये (३०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने राजुरा शहर चांगलेच हादरले आहे.
घटनेची माहिती होताच राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी घटनास्थळ गाठले. मात्र घटनास्थळी कुणीही आढळले नाही. रमाबाईनगर वाॅर्डातीलच काही अज्ञात लोकांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. वृत्त लिहिपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती.
प्राप्त माहितीनुसार, नरेश गजभिये याने सकाळी कुण्यातरी महिलेची छेड काढल्याची चर्चा होती. मात्र परिसरातील नागरिकांच्या मते नरेश छेड काढेल अशा स्वभावाचा नव्हता. तो थोडा मंद होता. तो हातात दांडा घेऊन फिरायचा. अशातच अचानक रात्रीला काही संतप्त व्यक्ती नरेश गजभिये याच्या घरी चालून आले.
घरात नरेशसोबत म्हातारी आई होती. आईच्या समोरच नरेशला त्याच्याच घरात पकडून हातपाय बांधले. तो पळून जाईल या भीतीने हातपाय बांधलेला दोर पलंगाला बांधला.
यानंतर त्या व्यक्तींनी नरेशला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच राजुरा चांगलेच हादरले. रमाबाईनगर परिसरात स्मशान शांतता पसरली होती. या घटनेबाबत कुणीही बोलायला तयार नव्हते. पोलीस नरेशच्या आईकडून आरोपींबाबत माहिती
घेत होते.
हल्लेखोर दोघे होते?
- नरेश गजभिये व त्याची म्हातारी आई दोघेच घरात राहात होते. नरेशचा विवाह झालेला नव्हता. नरेशच्या स्वभावाबाबत मात्र परिसरातील नागरिकांमध्ये काहीच तक्रारी नव्हत्या. हत्येच्या काही वेळापूर्वी नरेश हातात दांडा घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर दोन अज्ञात व्यक्ती नरेशच्या घरात घुसले. काहीवेळाने नरेशची हत्या झाल्याचे कळले. या घटनेने सर्वांना धक्का बसला. नरेशचे हातपाय दोराने बांधलेले होते. तो दोर पंलगालाही बांधून होता. अतिशय क्रूूरपणे हे हत्याकांड घडल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. नरेश दीड ते दोन वर्ष कारागृहात होता, अशीही चर्चा होती. मात्र कोणत्या गुन्ह्यात हे कळू शकले नाही.