लस घेतल्यानंतर काही तासातच युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:37+5:302021-09-16T04:35:37+5:30
आनंद भेंडे राजुरा (चंद्रपूर) : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतल्यानंतर राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथील श्याममूर्ती अंदेलवार या व्यक्तीचा मृत्यू ...
आनंद भेंडे
राजुरा (चंद्रपूर) : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतल्यानंतर राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथील श्याममूर्ती अंदेलवार या व्यक्तीचा मृत्यू दोन तासातच झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. आता या युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर पुढे येईल.
या युवकाला डेंग्यू झाला होता, ही बाब वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाली असली तरी मृत्यूचे तेच एकमेव कारण असण्याबद्दल गावातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत. दरम्यान या घटनेचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला तातडीने पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी या प्रकरणी बैठक बोलाविली आहे. लस घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू होणारे राज्यातील हे पहिले प्रकरण असल्याने या प्रकरणाची तीव्रता वाढली आहे.
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येरगव्हाण येथे केंद्रावर ११ सप्टेंबरला लसीकरण झाले. तेव्हा परिचारिकेने ताप नसल्याची खात्री करून सर्वांना लसीकरण केल्याचे आरोग्य विभागाने पुन्हा एकदा सांगितले आहे. परंतु श्याममूर्ती अंदेलवार याला तीन दिवसांपासून ताप येत होता, अशी माहिती मृत युवकाच्या घरूनच मिळाली. त्याची पत्नी व आईने ताप असल्याने लस घेऊ नको, असे सुचविले होते, तरीही या युवकाने लस घेतल्याचे समजते. लस घेतल्यानंतर काही तासातच प्रकृती बिघडल्याने श्याममूर्तीला तातडीने रूग्णालयात पाठवून उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले. तिथे त्याचा मृत्यू झाला.
बॉक्स
पीडित कुटुंबाला २० लाखांची मदत द्यावी
शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी येरगव्हाण येथे मृत युवकाच्या कुटुंबाची भेट घेतली. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून केंद्र सरकारने दहा लाख आणि राज्य सरकारने दहा लाख अशी एकूण २० लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून पीडित कुटुंबाला द्यावी, अशी मागणी मेलद्वारे पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोट
श्याममूर्ती अंदेलवार याला लस दिल्यानंतर गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आणले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
-डॉ. लहुजी कुळमेथे,
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, राजुरा.