पोंभुर्णा तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वाघाचा हल्ला, तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 10:58 AM2021-11-26T10:58:31+5:302021-11-26T10:59:40+5:30
राहुल पोंभुर्णा येथील बोरीच्या नाल्याजवळील स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ आपल्या साथीदाराची वाट बघत थांबला होता, तितक्यात रोडच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व फरपटत त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.
चंद्रपूर : गावागावांत गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करून पोंभुर्णा येथील बिराडाकडे परतत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता स्वामी विवेकानंद शाळेजवळील बोरीच्या नाल्याजवळ घडली.
राहुल गणपत चव्हाण (३०), रा. चनकापूर ता. वणी असे जखमीचे नाव आहे. विशेष म्हणजे, बुधवारी पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील कविटबोळी शिवारात वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केले होते. गुरुवारी पुन्हा एका युवकावर हल्ला झाला. महत्वाचे म्हणजे, हे दोन्ही वाघ वेगवेगळे असल्याचे सांगण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील चनकापूर येथील सदर कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी पोंभुर्णा शहरात राहत आहेत. खेड्यापाड्यात जाऊन गॅस दुरुस्तीचे काम करणे त्यांचे रोजचेच काम आहे. गुरुवारी सकाळी राहुल हा खेड्यावर शेगड्या दुरुस्तीसाठी गेला होता. तिथून परत येत असताना पोंभुर्णा येथील बोरीच्या नाल्याजवळ स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ तो आपल्या साथीदाराची वाट बघण्यासाठी थांबला होता, पण रोडच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व फरपटत त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.
दरम्यान, त्याचे दोन सहकारी देवदूत बनून त्याच्या दिशेने धावत गेले आणि वाघाच्या तावडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. जखमा जास्त असल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
वनविभागाची गस्त सुरू
बुधवारी कविटबोळी शिवारात वाघाने महिलेला ठार केल्यानंतर वनविभागाच्यावतीने परिसरात वन अधिकारी व वनकर्मचारी असे एकूण ३८ जणांचा ताफा गस्त घालत आहे. अशातच गुरुवारी हा हल्ला झाला. त्यामुळे वनविभागाने गांभीर्याने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.