आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 03:03 PM2022-11-02T15:03:10+5:302022-11-02T15:09:28+5:30
जनकापूर येथील घटना
उपरी (चंद्रपूर) : आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेला तरुण जनकापूर नहरात बुधवारी बुडाला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा शोध लागला नाही. पोलिसांनी दोन दिवस शोधमोहीम राबवली. दरम्यान, मंगळवारी त्याचा मृतदेह गोसेखुर्द नहरातील व्याहाड बुज येथे आढळून आला. चेतन कुमरे (२०, रा. चारगाव, ता. मूल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चारगाव येथील चेतन कुमरे आजीच्या अंत्यसंस्कारासाठी रविवारी जनकापूर येथे गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो आंघोळीसाठी नहरात उतरला. पाण्याची प्रवाह जास्त असल्याने तो पाण्यात बुडाला. तो बुडाल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली.
ठाणेदार मंगेश मोहोड व त्यांचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवली, तरीही कुठे पत्ता लागला नाही. त्यामुळे चंद्रपूर व सावली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या दोन्ही रेस्क्यू टीमने दिवसभर शोधमोहीम राबविली. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, मंगळवारी त्याचा मृतदेह सावली पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द नहरातील व्याहाड बुज येथे तरंगताना दिसून आला. ही माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना दिली. त्यांना माहिती मिळताच ठाणेदार बोरकर आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नहरातून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.
मासेमारी करताना तलावात बुडून मृत्यू
सावली : केरोडा येथील तलावात मासेमारी करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजता सुमारास घडली. सुखदेव बापूजी राऊत (६४, रा. केरोडा) असे मृताचे नाव आहे. सुखदेव राऊत हे मासेमारी करण्यासाठी केरोडा येथील तलावात गेले होते. मासेमारी सुरू असतानाच तलावातील मोठ्या खेड्यात तोल गेल्याने पडले. सोबत असलेल्या साथीदारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाणी जास्त असल्याने वाचविण्यात अपयश आले. मृतक सुखदेव राऊत हे केरोडा येथील वाल्मीकी संस्थेत सभासद होते. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.