तुमची 'मी' आता एकटीच आहे जी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:59+5:302021-05-10T04:27:59+5:30
वसंत खेडेकर बल्लारपूर : त्या तरुण ३५-४० वर्षे वयाच्या तरुण जोडप्याचा संसार सुखा-समाधानाने नीट चालला होता. एकमेकांवर जीवापाड प्रेम ...
वसंत खेडेकर
बल्लारपूर : त्या तरुण ३५-४० वर्षे वयाच्या तरुण जोडप्याचा संसार सुखा-समाधानाने नीट चालला होता. एकमेकांवर जीवापाड प्रेम ! त्यांना दोन लहान गोजिऱ्या सुंदर मुली, स्वतःच्या परिश्रमाने उभे केलेले छोटेसे घर व बऱ्यापैकी नोकरी. मुलींना चांगले शिकवून मोठे करावे, असे दोघांचे स्वप्न होते आणि त्याकरिता आतापासूनच त्यांची धडपड आणि नियोजन ! अशात, कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेत कोरोनाने त्याला घेरले. गृह विलगीकरणात असतानाच त्यांची प्रकृती एकाएकी बिघडली. रुग्णालयात दाखल केल्याचे दिवशीच त्याची प्राणज्योत विझली. सारे एका क्षणात संपले. जीवापाड प्रेम करणारा सखा गेला. पुढे काय? असा अतिगंभीर प्रश्न तिच्यासमोर उभा झाला.
माहेरची आर्थिक स्थिती बेताचीच! पण मन आभाळाएवढे मोठे व तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी आई व दोन भाऊ धावून आले. तिला जवळ करीत धीर देत ‘घाबरू नकोस, आम्ही आहोत ना’ म्हणत तिला पोटाशी धरले. आपली आई व भाऊ आपणाला कधीच दुरावणार नाहीत, असा तिला विश्वास आहे; पण तरीही ‘तो’ नसल्याने तिच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. तिला त्याची पदोपदी आठवण येते. त्याच्या मृत्यूला जेमतेम दीड महिना होत आहे. त्यात आला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षी ते आपल्या लग्नाचा वाढदिवस एकमेकांना शुभेच्छा देत आणि नातेवाईक व परिचितांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करीत. या वेळेच्या वाढदिवशी ‘तो’ नाही. ती एकटीच व त्याची गाढ स्मृती मनात आहेत. त्या आठवणींनी तिचे मन भरून येते. आणि तिचे बोटं वळतात आपली भावना शब्दात गुंफण्याकरिता मोबाइलवरील अक्षरांकडे! त्याच्या स्मृतीत आपले मन मोकळे करते आणि, अगदी शेवटी म्हणते - तुमची मी आता एकटी पडले जी....., तिचे सोशल मीडियावरील अखेरचे हे शब्द वाचून मन हेलावून जाते. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. क्रूर कोरोनाने अशा कितीतरी सौभाग्यवतींना विधवा करून त्यांना अभागी जिने नशिबी दिले आहे.