युवा शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या
By admin | Published: March 2, 2017 12:35 AM2017-03-02T00:35:44+5:302017-03-02T00:35:44+5:30
येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
नंदोरी : येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्यावर असलेले बँकेचे आणि खाजगी कर्ज हे आत्महत्येमागील कारण सांगितले जात आहे.
नितीन घाटे याच्या नावाने चार एकर शेती असून त्याच्यावर बॅँक आॅफ इंडिया नागरी शाखेचे ६५ हजार रूपयांचे कर्ज होते. या सोबतच दोन लाख रूपयांचे खाजगी कर्जही त्याच्यावर होते. या कर्जासाठी त्याने आपली शेती तारण ठेवली होती. काही दिवसांपूर्वी शेतीसाठी त्याने टॅ्रक्टर खरेदी केले होते. मात्र त्या कर्जाचे हप्ते न भरू शकल्याने टॅ्रक्टरची जप्ती झाली होती.
हे कर्ज त्याच्यावर थकित होते. यामुळे तो नेहमी विवंचनेत असायचा. २८ फेब्रुवारीच्या रात्री शांतता झाल्यावर त्याने आपल्या राहत्या घराच्या मोकळ्या जागेत जावून नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याच्या वडीलांना जाग आल्यावर तो बिछान्यावर दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू केल्यावर काही वेळानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
सकाळी वरोरा पोलिसांनी घटनास्थळी येवून प्रेत ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले. दुपारी त्याच्या पार्थिवावर नंदोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे वडील, एक बहिण, पत्नी असा आप्तपरिवार आहे. (वार्ताहर)
वाढदिवसाच्या दिवशीच
केली आत्महत्या
२८ फेब्रुवारी या दिवशी नितीनचा वाढदिवस होता. मात्र परिस्थितीमुळे त्याला आपला वाढदिवस साजरा करता आला नाही. नेमका हाच दिवस त्याने आपली जीवनयात्रा संपविण्यासाठी निवडला. हा योगायोग की नियतीचा खेळ असा प्रश्न या घटनेने पडला आहे.