मुंबईच्या तरुणाला पडली चंद्रपूरच्या इतिहासाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:37+5:302021-07-29T04:28:37+5:30
पिजदुराच्या ज्युरासिक पार्कसाठी झटण्याचा केला निर्धार नीलेश झाडे गोंडपिपरी : मुंबईच्या व्यक्तीला चंद्रपूरच्या इतिहासाशी काय देणंघेणं ? मात्र ...
पिजदुराच्या ज्युरासिक पार्कसाठी झटण्याचा केला निर्धार
नीलेश झाडे
गोंडपिपरी : मुंबईच्या व्यक्तीला चंद्रपूरच्या इतिहासाशी काय देणंघेणं ? मात्र येथील पुरातत्त्वीय अवशेषांनी त्याला वेड लावले. त्याने जिल्ह्याची यथेच्छ भ्रमंती केली आणि भूगर्भात दफन झालेला इतिहासाचा सोनेरी खजिना उजेडात आणला. पापामिया टेकडीच्या अश्मयुगीन संग्रहालयाच्या पाठपुराव्यानंतर आता पिजदुराच्या डायनोसार पार्कसाठी झटण्याचा निर्धार त्याने केला आहे. या मुंबईकर तरुणाचे नाव अमित भगत आहे.
मुंबईचा रहिवासी असलेल्या अमित भगत या तरुणाची नोव्हेंबर २०१४ मध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स या सरकारी कंपनीत प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्याची रवानगी थेट चंद्रपूरला करण्यात आली. लहानपणापासून इतिहासाचे वेड असणाऱ्या व सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर स्वच्छंद फिरून शेकडो किल्ल्यांची भ्रमंती केलेल्या या तरुणाला सह्याद्रीच्या डोंगररांगांइतकीच भुरळ पूर्व विदर्भाच्या जंगलांनी घातली.
इतिहासाच्या प्रेमापायी त्याने चंद्रपूर-गडचिरोलीचा भूभाग अक्षरशः पिंजून काढला. यातून चंद्रपूरचा नवा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आला. चंद्रपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेलगत वैनगंगेच्या खोऱ्यातील जवळपास आठ नवीन महापाषाणयुगीन स्थळे अमितने स्थानिकांच्या मदतीने २०१८ साली शोधून काढली. अमितने शोधलेल्या महापाषाणयुगीन स्थळांची दखल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घेतली. तिथे संशोधन मोहीम हाती घेऊन उत्खनन करण्याचे विभागाने ठरविले आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यात ३० पेक्षा अधिक पुराणाश्म आणि मध्याश्मयुगातील स्थळे शोधली.
नव्याने होऊ घातलेल्या चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत पापामिया टेकडी नावाचे अश्मयुगीन स्थळ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने १९६०-६१ मध्ये शोधले होते. परंतु कालांतराने ते ऐतिहासिक स्थळ विस्मृतीत गेल्याने ते नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अमितने त्या स्थळाच्या बचावासाठी जिल्हा, राज्य व केद्र पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्याच्या प्रदीर्घ प्रयत्नांना यश आले. त्याच्या अहवालाची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात ४ एकरचे क्षेत्र संबंधित स्थळासाठी राखीव ठेवून त्या ठिकाणी दक्षिण आशियातील एकमेवाद्वितीय ठरेल, असे प्रागैतिहासिक संग्रहालय बांधण्याची योजना आखली असून त्या योजनेकरता ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली आहे. अमितच्या या संशोधनाने चंद्रपूरच्या इतिहासात मोठी भर पडली आहे.
बॉक्स
डायनासोर पार्कसाठी लढा देऊ
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याजवळील पिजदुरा येथे सुमारे ६.५ कोटी वर्षापूर्वीच्या डायनासोर या प्रजातीचे जीवाश्म शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. पिजदुराला अमितने बऱ्याचदा भेटी देऊन त्या स्थळाचे सखोल सर्वेक्षण केले आहे. पिजदुराचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारी शेकडो कागदपत्रे, पुरावे व पुष्कळसे संदर्भ त्याच्या संग्रही आहेत. उचित संधी मिळाल्यास लोकप्रतिनिधींसमोर त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे.
280721\img-20210728-wa0040.jpg
अमित भगत