तरुणांना व्यवसाय शिक्षणाची नितांत गरज
By Admin | Published: April 30, 2017 12:36 AM2017-04-30T00:36:44+5:302017-04-30T00:36:44+5:30
देशातील तरुणांना व्यवसाय शिक्षण दिल्याशिवाय तरणोपाय नाही. मागील दोन दशकांत व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण चीनच्या मागे पडलो आहोत.
रणजित पाटील : एमसीव्हीसी शिक्षकांचे अधिवेशन
गडचांदूर : देशातील तरुणांना व्यवसाय शिक्षण दिल्याशिवाय तरणोपाय नाही. मागील दोन दशकांत व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण चीनच्या मागे पडलो आहोत. त्यामुळे आय.टी.आय. व एम.सी.व्ही.सी. अभ्यासक्रमाला भविष्यात महत्त्व येणार असून त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री तथा कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
शेगाव येथे संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात एम. सी. व्ही. सी. शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र व्होकेशनल कोर्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ. युगल रायलू होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक पी. टी. देवतळे, संघटनेचे महासचिव प्रा. संदीप रेवतकर, उपाध्यक्ष प्रा. शंंकर केळझरकर, प्रा. जयंत भांबे, प्रा. भालचंद्र येडमे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. आकाश फुंडकर, सहसंचालक पी.टी. देशमुख, गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमानी, संस्थानचे अध्यक्ष पाटील यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अधिवेशाच्या दुसऱ्या सत्रात एम. सी. व्ही. सी. मधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा तसेच नवनिर्वाचित महानगरपालिकावर सदस्याचा सत्कार करम्यात आला.
महाराष्ट्रातील एम. सी. व्ही. सी. अभ्यासक्रमातील शिक्षकांना सुधारित वेतन श्रेणी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा. शालिक फाले यांच्या प्रयत्नाने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या परिश्रमातून मिळाल्याचे जिल्हा सचिव प्रा. राजूरकर यांनी सांगितले. संचालन प्रा. कुळकर्णी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रकाश तराळे, प्रा. महेंद्र कंकाळे, प्रा. अनिल देशमुख, राजेश सावरकर, जगन्नाथ बरडे, विजय कोल्हे, प्रियश्री नागपुरे, सुनील आखरे, सुरेंद्र वानखेडे, विजय वाकडे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)