युवकांनी लावला बिबट कातडी तस्करीचा छडा
By admin | Published: April 1, 2017 01:37 AM2017-04-01T01:37:36+5:302017-04-01T01:37:36+5:30
चंद्रपुरातील टायगर हंटींग एंड असोसिएशन या संस्थेत काम करणाऱ्या युवकांनी छत्तीसगडध्ये जावून बिबटाच्या कातडीच्या तस्करीचा छडा लावला.
छत्तीसगडमध्ये तिघांना अटक : टायगर हंटिंग अॅण्ड असोसिएशनचा पुढाकार
चंद्रपूर : चंद्रपुरातील टायगर हंटींग एंड असोसिएशन या संस्थेत काम करणाऱ्या युवकांनी छत्तीसगडध्ये जावून बिबटाच्या कातडीच्या तस्करीचा छडा लावला. या प्रकरणी तीन आरोपींनी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आले आहे.
२६ मार्च रोजी छत्तीसगड येथील कापसी जवळील पी.व्ही.-६ या वसाहतीतून तीन व्यक्तींना बिबट्याच्या चामड्यासह अटक करण्यात आली. कोयगाव येथील सुखदेव, मानपूर येथील रजनू राम आणि ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी रेतेगाववरून पाखांजूरला चामड्यासह जात असताना टायगर हंटींग एंड असोसिएशनच्या सदस्यांनी या टोळीला पकडून दिले.
या टोळीकडे बिबटाचे चामडे असल्याची गोपनिय माहिती टायगर हंटींग एंड असोसिएशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यामुळे हे सदस्य मागील अनेक दिवसांपासून टोळीच्या मागावर होते. दरम्यान २६ मार्चला ही टोळी टप्प्यात येताच छत्तीगड पोलीस आणि वनविभागाचे राजनांदगाव येथील डीएफओ अरूण प्रसाद तसेच अंबागड चौकीचे वनपरिक्षेत्राधिकारी संदीप सिंग यांच्या सहकार्याने त्यांना अटक करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)