वेळेवर उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:22 PM2017-12-05T23:22:02+5:302017-12-05T23:22:25+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर असलेल्या युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भिसी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर असलेल्या युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्राथमिक उपचार न करताच त्याला नागपूर येथे रेफर केले. त्यामुळे त्या युवकाचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे युवकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी करीत धरणे दिले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगंबर मेश्राम यांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
भिसी येथील आकाश राजकुमार पाटील (२७) याला त्यांच्या कुटुंबियांनी ३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी रुग्णालयात एकही आरोग्य अधिकारी हजर नव्हता, यावेळी डॉ. गेडाम यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगत फोन कट केला. नुकत्याच रुजू झालेल्या महिला वैद्यकीय अधिकारी जैन यासुद्धा केंद्रावर नव्हत्या. एक तासानंतर तिथे परिचारिका पोहोचली. यानंतर रुग्णाला आॅक्सिजन सिलिंडर लावण्यात आले. मात्र हे सिलिंडरच पूर्णपणे रिकामे होते. अखेर या रुग्णाला नागपूर येथे हलविण्याचे सांगून परिचारिकेने देखील हात वर केले. यानंतर खासगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला नागपूर येथे पाठविण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे युवकांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
वेळेवर उपचार न झाल्याने आकाशचा मृत्यू झाला, असा आरोप करीत त्यांच्या नातेवाईकांनी, जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देत त्यासंबधित अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यास पाठविले.