युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित भावना ठेवून कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 12:57 AM2017-01-19T00:57:39+5:302017-01-19T00:57:39+5:30
श्रमसंस्कार शिबिरातून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असते.
संभाजी वरकड यांचे प्रतिपादन : गोवरी येथे श्रमसंस्कार शिबिर
राजुरा : श्रमसंस्कार शिबिरातून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असते. आपल्या असामान्य कर्तुत्वाने महान झालेल्या महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात केले पाहिजे. श्रमसंस्कार शिबिरातून समाजात चिरंतन टिकणारी मुल्य रूजली पाहिजे. यासाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे. देश घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेतून कार्य करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.संभाजी वारकड यांनी केले.
शिवाजी महाविद्यालय राजूराच्या वतीने गोवरी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनील उरकुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अविनाश जाधव, हरिचंद्र जुनघरी, गोपीनाथ जमदाळे, नागोबा लांडे, दिवाकर झाडे, संचालक प्राचार्य दौलतराव भोंगळे, मुख्याध्यापक देवराव निब्रड, रामदास बोथले, ग्रामविकास अधिकारी सचिन विरुटकर, कार्यक्रम अधिकारी विशाल दुधे आदी पाहुणे मंचावर उपस्थित होते.
सतत पाच दिवस चाललेल्या श्रमसंस्कार शिबिरात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सरपंच सुनील उरकुडे यांनी घराघरात स्वच्छतेचा मुलमंत्र रुजविण्यासाठी नागरिकांची मने स्वच्छ करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे. तसेच सुदृढ व निरोगी समाज रचनेचा पाया प्रत्येकांच्या मनात रूजला पाहिजे यासाठी युवकांनी कार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विशाल दुधे यांनी केले. संचालन संजय लाटेलवार यांनी तर उपस्थिताचे आभार प्रा. राजेंद्र मुद्मवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)