चंद्रपूर जिल्ह्यात नरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव; दोन मांत्रिकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:18 PM2018-08-30T13:18:48+5:302018-08-30T13:21:19+5:30
गुप्तधनाच्या आशेने ललचावलेल्या दोन क्रूरकर्म्यांनी ब्रह्मुपुरीतील खंडाळा येथे राहणाऱ्या दोन वर्षांच्या युग अशोक मेश्रामचा नरबळी दिल्याचे पोलिस सूत्रांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गुप्तधनाच्या आशेने ललचावलेल्या दोन क्रूरकर्म्यांनी ब्रह्मुपुरीतील खंडाळा येथे राहणाऱ्या दोन वर्षांच्या युग अशोक मेश्रामचा नरबळी दिल्याचे पोलिस सूत्रांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद बनकर (४३) व सुनिल बनकर (३५) या खंडाळा गावातीलच दोन मांत्रिकांना ताब्यात घेतले आहे. काल अटक करण्यात आलेल्या युगच्या आईला आज पोलिसांनी मुक्त केले आहे. या प्रकरणामुळे अवघा चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.
असे घडले अपहरण व हत्या
२२ आॅगस्ट रोजी युग आपल्या भावंडांसोबत खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्याला या आरोपींनी खेळत असताना उचलून नेऊन गावातीलच एका निर्जन झोपडीत बंद करून ठेवले होते. २३ आॅगस्टच्या रात्री त्यांनी त्या झोेपडीत अघोरी पूजा केली व युगचा बळी घेतला. त्यांना त्याचा मृतदेह नदीत फेकायचा होता. मात्र दरम्यान पोलिसांनी केलेल्या कडेकोट बंदोबस्त व तपासकामामुळे त्यांचा हा बेत यशस्वी झाला नाही. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी २७ आॅगस्टच्या रात्री तो एका तणसाच्या ढिगाऱ्याखाली दडवून ठेवला. २९ आॅगस्ट रोजी या ढिगाºयाजवळ अनेक कोंबड्या टोचे मारत असल्याचे पाहून संशय आल्याने तेथे तपास करण्यात येऊन मृतदेह ताब्यात घेतला गेला.
एक वर्षापासून करत होते नरबळीची तयारी
आरोपींना गडचिरोलीतल्या आरमोरीतील एका मोठ्या मांत्रिकाने नरबळी दिल्यास तुम्ही मालामाल व्हाल असा सल्ला दिला होता. त्यानुसार ज्याच्या डोक्यावर तीन भोवरे आहेत अशा मुलाचा ते शोध घेत होते. या शोधातच त्यांना युगच्या डोक्यावर तीन भोवरे असल्याचे आढळून आले होते. त्यांनी वर्षभर त्याच्यावर पाळत ठेवली होती. मध्यंतरी त्यांनी एकदा युगच्या अपहरणाचा प्रयत्नही केला होता. मात्र तो यशस्वी झाला नव्हता.
अशी होती घटना
२२ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास युग अशोक मेश्राम हा बालक घराजवळच्या चौकात आपल्या चार वर्षीय मोठ्या भावासोबत वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. अशातच तो दिसेनासा झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही तो गवसला नाही. अखेर ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून युग बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. तेव्हापासून ब्रह्मपुरीसह जिल्हा पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रीत करून युगचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही शोध लागत नाही. अखेर ब्रह्मपुरी लगतच्या तालुक्यांसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पथके पाठवून शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आपल्या परीने तपासात गुंतले होते. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक व बसस्थानकावर युगचे छायाचित्र दाखवून शोध घेण्यात आला. मंगळवारी घराशेजारील व गावातील लोकांना आवाहन करून एकत्र बोलाविण्यात आले. दरम्यान ५० वर लोकांचे बयाण घेण्यात आले. यातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाली होती.
युगचा शोध घेण्यासाठी ब्रम्हपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेसी, ठाणेदार दीपक खोब्रागडे, सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, चिमूर, सिंदेवाही, नागभीड ,तळोधी, भिसी, पाथरी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व पोलिस कर्मचारी तपासात गुंतली होती.