शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:04+5:30
रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि यासारख्या अनेक रानभाज्या पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भद्रावती शाखा यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह भद्रावती येथे आयोजित रानभाज्या महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती प्रविण ठेंगणे, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, मंडळ कृषी अधिकारी चंदनखेडे, यु. बी. झाडे, किशोर उपरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर दिवसे, शेतकरी मित्र अजय पिंपळकर, माधव जीवतोडे यांची उपस्थिती होती.
तालुक्यातुन विविध रानभाज्याचे ३१ स्टॉल लावण्यात आले होते. या प्रसंगी मान्यवरांनी तथा उपस्थित शेतकऱ्यांनी राजभाज्यांचे महत्त्व पटवून दिले. या सर्व रानभाज्या शून्य खर्चातले नैसर्गिक पीक असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रथिने, जीवनसत्वामुळे आजार व विकासावर मात करण्यास मदत होते. तसेच हे उत्पादन फार कमी अवधीत होत असून या रानभाज्यांची जनजागृती झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरू शकते, असे स्टॉलधारक शेतकऱ्यांनी सांगितले.
रानभाज्या महोत्सवात काळा तांदूळ, कोहळा, बांबु, कडु तोंडले, आंबुसी, वाघाटी, पुडाच्या शेंगा, पातूर, अंबाडी, भुई आवळी, केना, फोमटी, तरोटा आदी भाज्या होत्या.
राजुऱ्यातही महोत्सव
राजुरा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी व रानफळे महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजुरा बाजार समितीचे सभापती सी. कवडू पोटे, तसेच जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती राहुल उरकुडे, उपसभापती मंगेश गुरनुले, नलगे, जि. प. सदस्य कुंदा जेणेकर, वाघोजी गेडाम, आदिवासी राज्य पुरस्कार प्राप्त सेवक राजभाऊ ढोमणे, गोविंदा मोरे,विठ्ठल मकपल्ले, चेतन चव्हाण, ढवस, संदीप दातारकर, किशोर चंदनवटे आदीची उपस्थिती होती. या महोत्सवात सुरूंग, काटेमार, नळी, कुवाडी, तांदुळका, कुरडू, खापर खुटे, फोफुंडा, पातूर, कोंबई, मलबेरी, ग्रिन टी इत्यादी रानभाज्या तालुक्यातील मांगली, पेवरा, मुधोली कोंढा, आष्टी (वडेगाव), मांगली व इतर गावामधून शेतकºयांनी आणल्या होत्या.
रिमझीम पावसात रानभाज्यांचा नजराना
वढोली : रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि यासारख्या अनेक रानभाज्या पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.
चंद्रपूर जिल्हा वनवैभवाने संपन्न आहे. येथील जंगलात मोठया प्रमाणावर दुर्मीळ वन्यजीव आढळतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनाला उपयोगी रानभाज्यांचा खजिना येथे आहे. मानवी आरोग्यास अतिशय लाभदायी ठरणाऱ्या विविध रानभाज्या जंगलालगत असणारे नागरिक चवीने खातात .पण आता रानभाज्या, रानफुले उपलब्ध असूनदेखील अनेकांना माहित नाही. त्यामुळ हा महत्त्वपूर्ण रानठेवा दुर्लक्षित आहे. या सर्व रानठेव्याची माहिती व्हावी, या हेतून रविवारी गोंडपिपरी तालुका कृषी कार्यालयात रानभाजी महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवात जंगली भागात वास्तव्य करणाऱ्या अनेक शेतकरी बांधवांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणल्या. अनेकांनी या भाज्या पहिल्यादांच बघितल्या. उत्सुकतेपोटी भाज्यांची माहिती जाणून घेतली. अनेक महिलांनी या महोत्सवात सहभाग घेतला. महोत्सवाचे प्रमुख आयोजक तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, तहसीलदार सीमा गजभीये, मुख्याधिकारी माधुरी सलामे, नगराध्यक्ष सपना साखलवार, जि.पं.सदस्य वैष्णवी बोडलावार यावेळी उपस्थित होते.