जिल्हा परिषदेचा संवेदना उपक्रम
By admin | Published: October 28, 2016 12:43 AM2016-10-28T00:43:12+5:302016-10-28T00:43:12+5:30
गरीब गरजवंतांना निदान शरिरावर वस्त्र परिधान करण्यास मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी
एसपींच्या हस्ते उद्घाटन : गरजवंतांना जुन्या कपड्यांचे वितरण
चंद्रपूर : गरीब गरजवंतांना निदान शरिरावर वस्त्र परिधान करण्यास मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘संवेदना उपक्रम’ नावाने जुन्या कपड्याची बॅक सुरु केली आहे. या उपक्रमातून जुने कपडे गोळा करुन गरजवंतांना वितरित करण्याच्या कामास गुरूवारी सुरूवात झाली आहे.
या उपक्रमाअंतर्गत गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह व पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या हस्ते संवेदना उपक्रमाचे उद्घाटन करून गरीब गरजवंतांना परिधान करण्यायोग्य कपड्यांचे वाटप करण्यात आले. संवेदना उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी या उपक्रमात स्वत:हून सहभागी होत आहेत. या सहभागाची फलश्रुती म्हणून अडीच हजारच्यावर जिल्हास्तरावर लहान मुलांपासून तर मोठ्या महिला, पुरुष यांचे परिधान करण्यायोग्य कपडे जमा झाले आहेत.
हाच उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी राबवत आहेत. यामुळे पंचायत समितीस्तरावर गोळा झालेली सर्व कपडे जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या कपडा बँकेत जमा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद आवारात ‘संवेदना’ या नावाने स्टॉल उभारले असून स्वामी कृपा बहुद्देशिय संस्थेच्या सहकार्याने गोरगरिब गरजवंतांना कपडे वितरणाचे काम चालु आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कपडे वितरण करणाऱ्या स्टॉलला गोरगरिब भेट देत असून त्यांच्या मापाचे व चांगले वाटणारे कपडे दिल्या जात आहे. या उपक्रमामुळे वस्त्र मिळणाऱ्या गरिब गरजवंतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)