जिल्हा परिषद शाळा टाकताहेत कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:45 PM2017-12-25T23:45:08+5:302017-12-25T23:45:17+5:30
संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून.....
सतीश जमदाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाळपूर : संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून तेथील शिक्षक हे माझी शाळा प्रगती कशी साधणार, याकडे जातीने लक्ष देत आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, आंतर-बाह्य स्वच्छता, शालेय शिस्त, व्यवस्थापन सुलभता, शिक्षक जबाबदारी अशा किचकट निकषांची पुर्तता करून आतापर्यंत ११ जि. प. शाळा आयएसओ मानांकित ठरल्या आहेत.
आयएसओ मानांकित असलेली पिंपळगाव ही शाळा शाळा सिद्धी उपक्रमात राज्यात ७४ व्या स्थानी आहे. या शाळेत शालेय परिपाठाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ११ ही शाळांमधील शिक्षक शैक्षणिक कामे पूर्ण करून आपली शाळा कशी सरस ठरेल, यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवून अधिकचे वर्ग घेतले जात आहे. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. या शाळांच्या भरारीत गावातील नागरिकांचाही मोलाचा वाटा आहे. विविध उपक्रमात गावकरी हिरहिरीने सहभाग दर्शवून शाळेला वाटेल ती मदत करतात. श्रम असो की, आर्थिक बाजू नागरिक सहकार्य करीत असल्याने तालुक्यातील शाळा प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत ११ शाळांना आयएसओ नामांकन मिळाले असून काही शाळा नामांकनाच्या उंबरठ्यावर आहेत.
मुले बोलतात इंग्रजी
जिल्हा परिषद शाळेत मुलाला दर्जेदार शिक्षण मिळत नाही, त्याला इंग्रजी वाचता येत नाही, असा अनेक नागरिकांचा भ्रम आहे. मात्र त्याला अपवाद ठरवत पिंपळगाव येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मुलांना लाजवेल, अशी इंग्रजी बोलतात. त्यांचे चांगल्या प्रकारे लिखाण, वाचन आहे. या शाळेत उन्हाळ्यातसुद्धा इंग्रजी विषयाचे अधिकचे वर्ग घेतले जातात.
या शाळा आयएसओ मानांकन
कोरपना तालुक्यातील हिरापूर, थुटरा, लखमापूर, गोपालपूर, पिंपळगाव, आवाळपूर, बिची, गेडामगुडा, आसन (बु.), भोयगाव, कोल्हापूर गुडा अशा ११ शाळा आतापर्यंत आयएसओ मानांकित ठरल्या आहेत.
नियोजन व त्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे म्हणजे आयएसओचे ब्रीद आहे. यातून नक्कीच विद्यार्थी विकासासाठी वाव मिळत असून काही तरी नाविन्यपूर्ण केल्याचे समाधान मिळते.
- सुधाकर मडावी
मुख्याध्यापक, जि. प. शाळा हिरापूर.
लोकसहभागातून शिक्षकांनी शाळेत पूर्ण भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. खाजगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा मागे राहू नये, शैक्षणिक दर्जा सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. यात शिक्षकांत चुरस निर्माण झाली आहे.
- विलास देवाडकर
केंद्रप्रमुख, कोरपना.