जिल्हा परिषद पदभरतीमध्ये गोंधळ ?
By Admin | Published: November 17, 2014 10:50 PM2014-11-17T22:50:14+5:302014-11-17T22:50:14+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी पदभरती घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज सादर केले. काही पदांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. मात्र उमेदवारांमध्ये
चंद्रपूर : जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी पदभरती घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज सादर केले. काही पदांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. मात्र उमेदवारांमध्ये या पदभरतीवरून गोंधळ असून यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या गोंधळासारखी स्थिती येथेही असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पशुपर्यवेक्षक आदी पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जिल्हा परीषद प्रशासन पारदर्शक असल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. एवढेच नाही तर आपल्याकडील असलेल्या संपत्तीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळावी यासाठी त्यांनी कॅबीनच्या दर्शनीभागास बोर्ड लावून त्यावर संपूर्ण माहिती लिहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना पदभरती पारदर्शन होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकांनी विविध पदांसाठी अर्ज सादर केले आहे. मात्र सध्या पदभरतीमध्ये गोंधळ असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. एकाच उमेदवारांचे तीन ते चार वेळा नाव टाकण्यात आल्याचेही उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करण्यासाठी आर्थिक भार सोसावा लागला आहे. त्यामुळे पदभरती पारदर्शक कशी, असा प्रश्नही उमेदवारांनी उपस्थित केला आहे. तक्रार केल्यास आपल्यावर कारवाई होईल, या भीतीने उमेदवार बोलण्यास तयार नाही.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पदभरतीमध्ये पारदर्शकता ठेवून बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी किमान अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)