जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक कोलमडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2022 11:50 PM2022-11-06T23:50:31+5:302022-11-06T23:51:08+5:30
ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३१ ऑक्टोबर, २२ ते १ नोव्हेंबर, २२ या कालावधीमध्ये अवघड क्षेत्रांची यादी, बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, ६ नोव्हेंबर उजाडला असतानाही या यादी शिक्षण विभागाने जाहीर केल्याच नाही. दरम्यान, वेळापत्रकानुसार ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत संवर्ग एक आणि संवर्ग २ या संवर्गातील शिक्षकांना बदली हवी आहे की नाही, याबाबतचे अर्ज करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटानंतर या वर्षी जिल्हांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार शिक्षकांच्या बदल्या करणे अपेक्षित असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या पत्रानुसार कार्यवाही न केल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी बदलीनुसार नियोजन केले आहे. मात्र, त्यांचेही हे नियोजन आता कोलमडण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३१ ऑक्टोबर, २२ ते १ नोव्हेंबर, २२ या कालावधीमध्ये अवघड क्षेत्रांची यादी, बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, ६ नोव्हेंबर उजाडला असतानाही या यादी शिक्षण विभागाने जाहीर केल्याच नाही. दरम्यान, वेळापत्रकानुसार ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत संवर्ग एक आणि संवर्ग २ या संवर्गातील शिक्षकांना बदली हवी आहे की नाही, याबाबतचे अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, बदलीपात्र शिक्षकांच्या अद्यापही याद्याच न लागल्याने, या संवर्गातील शिक्षकांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वेळापत्रकानुसार याद्या जाहीर तर केल्या नाहीच, दुसरीकडे बदलीपात्र शिक्षकांना या संदर्भात काहीच माहिती दिली नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे.
समानिकरणामध्ये अनेक शिक्षकांना धक्का
बदलीपात्र शिक्षकांच्या अजूनही याद्या लागल्या नसल्या, तरी समानिकरणासाठी शिक्षण विभागाने अधिक लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सद्यस्थितीत सहायक शिक्षकांच्या २६० जागा, तर भाषा, विज्ञान विषयाच्याही वेगळ्या जागा समानिकरणासाठी ठेवल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रात जावे लागणार आहे. विशेष म्हणजे, आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांसाठी तर या जागा ठेवल्या नसतील ना, अशीही कुजबुज शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
झेडपीत वाढल्या शिक्षकांच्या चकरा
ग्रामविकास विभागाने बदलीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बदलीपात्र शिक्षकांनी जिल्हा परिषदेमध्ये चकरा मारणे सुरू केले आहे. सध्या दिवाळीची सुट्टी आहे. असे असतानाही बदलींसदर्भातील घडामोडीकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
आंतरजिल्हा बदलीने आले ७० शिक्षक
- मागील काही दिवसांमध्ये आंतरजिल्हा बदली करून चंद्रपूर जिल्ह्याला १६८ शिक्षकांनी पसंती दिली आहे. यातील ७० शिक्षक रुजू झाले आहे. त्यापैकी ६१ शिक्षकांना अवघड क्षेत्र वगळून बदली दिली आहे, तर उर्वरित ९ शिक्षक शाळा मिळण्याच्या रांगेत आहे. दरम्यान, ९८ शिक्षक अजूनपर्यंत जिल्ह्यात दाखल झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.