जिल्हा परिषद बदल्यांचा पोळा फुटला
By admin | Published: May 10, 2017 12:46 AM2017-05-10T00:46:22+5:302017-05-10T00:46:22+5:30
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सिंचन, पाणीपुरवठा, पंचायत : समूपदेशनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्हा परिरषदेच्या कन्नमवार सभागृहात समूपदेशन करून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या करण्यात येत आहेत. त्याकरिता ग्रामीण भागातून कर्मचारी मुख्यालयी दाखल होत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना बदलीची धोरणात्मक आदेशाची प्रतीक्षा आहे.
सोमवारी पंचायत, बांधकाम विभाग, कृषी विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, लिपीक, सिंचन विभाग, आरोग्य विभाग आदी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. ही बदली प्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती. या बदल्या जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत सुरू आहे. ज्या तालुक्यात नेहमीच रिक्त पदे जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा अधिक असलेल्या भागातील किंवा तालुक्यातील ती पदे प्रशासकीय किंवा विनंती बदलीने भरणे आणि आदिवासी भागात जास्त कालावधीत सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सामान्य भागात जाण्यासाठी प्राधान्यक्रमात देण्यात येत आहे. त्यानुसार, विविध संवर्गातील कर्मचाऱ्याच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे समूपदेशन करून बदल्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक वित्त विभागातील लेखाधिकारी, सहायक लेखा, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षक, कृषी विभागातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत विभागातील विस्तार अधिकारी (पं), ग्रामविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग बांधकाम विभाग, आरोग्य विभागआदींच्या समूपदेशनाने बदल्या करण्यात येत आहेत. यावेळी महीला व बालकल्याण सभापती केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती जीवतोडे, समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे, अर्थ सभापती तंगडपल्लीवार उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार आदी उपस्थित होते.
नक्षलग्रस्त भागात सेवा बंधनकारक
बदलीतून सूट देण्यात आलेले कर्मचारी वगळता प्रत्येक कर्मचाऱ्याने विहित धोरणाच्या अधिन राहून आदिवासी , नक्षलग्रस्त भागात काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या धोरणानुसार या क्षेत्रातील रिक्त पदे भरताना पूर्वी अशा क्षेत्रात सलग तीन वर्षे काम केलेले कर्मचारी वगळता प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेनुसार विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पात्रता असलेले व त्यांनी अशा क्षेत्रात कार्यकाल संपवून पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेनुसार विचार करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या बदल्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहे. या बदल्यांमध्ये शासनाने शासनाने ठरविलेले सर्व निकष पाळले जाणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले जात आहे.
- देवराव भोंगळे,
जिल्हा परिषद अध्यक्ष