जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा होणार डिजीटल
By admin | Published: July 27, 2016 01:11 AM2016-07-27T01:11:30+5:302016-07-27T01:11:30+5:30
वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेअंतर्गत
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : विद्यार्थ्यांना मिळणार ई-लर्निंगचे धडे
चंद्रपूर : वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांना डिजीटल करण्याच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६०० प्राथमिक शाळांना डिजीटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद यांनी २५ जुलै रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना डिजीटल शाळा करण्याचा मनोदय जाहीर केला होता. त्याअनुषंगाने त्यांनी मानव विकास आयुक्तालयाच्या स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले. जिल्हा परिषदेच्या ६०० प्राथमिक शाळांना डिजीटल करण्यासाठी ४४७.२५ लक्ष च्या योजनेला मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ई-लर्निंगची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उंचावण्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रती शाळा ७४ हजार रूपयाचा खर्च अपेक्षित
डिजीटल शाळा करण्यामध्ये मुल, पोंभुर्णा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा, जिवती तालुक्यातील प्रत्येकी ५७ शाळा, सावली ५१, व गोंडपिपरी तालुक्यातील ४७ अशा ६०० शाळांचा समावेश आहे. प्रती शाळा डिजीटल करण्यासाठी संगणक संच २६ हजार ४४ रूपये, प्रोजेक्टर ३१ हजार १६८ रूपये, स्पीकर अडीच हजार रूपये, प्रिंटर्स ४ हजार ९२८ रूपये, सॉफ्टवेअर ९ हजार ९०० रूपये असा अंदाजित खर्च येणार असून प्रती शाळा सरासरी ७४ हजार ५४२ रूपये खर्च अपेक्षित आहे.