जिल्हा परिषदेचा ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:59 PM2018-03-19T23:59:58+5:302018-03-19T23:59:58+5:30
जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या अर्थसमितीच्या सभेत ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या १५ विभागांसाठी विविध कामांची तरतूद करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या अर्थसमितीच्या सभेत ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या १५ विभागांसाठी विविध कामांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जिल्हा परिषद अर्थसंकल्पासाठी तयारी सुरू होती. १३ मार्चला अर्थसमितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होते. मात्र, तांत्रिक कारण देत ही सभा रद्द करण्यात आली होती. ही सभा सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली.
यावेळी अर्थ समितीसमोर ४९.६५ कोटींचा अर्थसकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. यात १५ विभागांसाठी विविध योजनाची तरतूद व विकास कामांचा समावेश होता. त्यामुळे अर्थसमितीने यावर चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसमितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प २१ मार्चला होणाऱ्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.
कामांची माहिती न दिल्याचा आरोप
अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी सोमवारी अर्थ समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प समितीने मंजूर केला. यात अध्यक्षांनी सुचविल्याप्रमाणे २ कोटीच्या विशेष कामांची तरतूद करण्यात आली. मात्र ही कामे कोणती, याबाबत विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी कामांची यादीही मागितली. मात्र, सभापतीनी कोणतेही उत्तर न देता सभा गुंडाळल्याचा आरोप विरोध पक्षांनी केला आहे.