पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेचे हात वर
By Admin | Published: April 28, 2017 12:50 AM2017-04-28T00:50:53+5:302017-04-28T00:50:53+5:30
जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.
सत्ताधारी ढिम्म : परिस्थितीवर मात करण्यासाठी सभाच नाही
चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेने वेळीच उपायोजना करण्याची गरज होती. मात्र एवढी गंभीर समस्या असतानाही सत्ताधाऱ्यांनी कोणतीही उपायोजना न करता, जिल्हा परिषदेची पाणी टंचाईवर एकही सभा घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी केवळ विकासाचा कांगावा करीत असून जिल्हा परिषद ढिम्म असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते सतीश वारजूकर यांनी केला आहे.
पाणी टंचाईवर आढावा बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणून गटनेता डॉ. सतिश वारजुकर यांनी काँग्रेसचे २१ सदस्य व ४ सभापती यांच्या स्वाक्षरीनिशी जि.प. अध्यक्षांना नोटीस दिली होती. या अगोदरही मागील वर्षीचा आढावा घेण्यासाठी ५ एप्रिलला नोटीस दिली होती. ती सभा २ मे रोजी म्हणजे तब्बल २७ दिवसांनी लावली. पण पाणी पुरवठा योजनेवरील पहिला हप्ता मिळाला की दुसऱ्या हप्त्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी लागते. त्यावर काहीही उपाय योजना करीत नाही. जिल्हा परिषदेत फाईली सहा-सहा महिने फिरत असतात. जो सतत पाठपुरावा करीत असतो व पैसे देत असतो अशांचीच फाईल बाहेर काढली जाते, असा आरोप वारजूकर यांनी केला आहे.
जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडत आहे. जिकडे-तिकडे आगीच्या घटना घडत आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे आगी आटोक्यात येत नाही व घरे जळून खाक होत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. परंतु जि.प.तील पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. अनेक गावात हातपंप बंद पडले आहेत. तर कुठे कंत्राटदाराच्या तर कुठे अधिकाऱ्यांच्या तर कुठे पदाधिकाऱ्यांच्या हेकेकोरपणामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत.
अनेक ठिकाणी फ्लोराईड युक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु लोकांचा नाईलाज असल्यामुळे असेही पाणी प्यावे लागत आहे. मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे.
लोकांचा जिवन मरणाचा प्रश्न असतानाही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हातपंप आणि पाणी पुरवठा योजनाही बंद
काही काही गावे अशी आहेत की, त्या गावांमध्ये मोजकेच हातपंप आहेत, परंतु तेही बंद आहेत. ते दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीची अपुरी वाहने असल्यामुळे हातपंप दुरुस्ती होवू शकत नाही. अशा गावातील लोकांना पाण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे अर्धवट काम झाले आहे. योजनेचे काम कसे झाले, योग्य झाले की काय, यावर कोणाचेही लक्ष नाही. केवळ कमिशनच्या हव्यासापोटी कामाची पाहणी न करता देयके दिल्या जात आहेत, असा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.