जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:19 PM2019-07-16T23:19:27+5:302019-07-16T23:19:47+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर अंदाजपत्रकात गणवेशाचा निधी अडकला होता. आता गणवेशासाठी लागणारा तीन कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे या निधीतून तातडीने गणवेश खरेदी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती क्रिष्णा सहारे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर अंदाजपत्रकात गणवेशाचा निधी अडकला होता. आता गणवेशासाठी लागणारा तीन कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे या निधीतून तातडीने गणवेश खरेदी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती क्रिष्णा सहारे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सोमवारी सभापती क्रिष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रोषणी खान, जिल्हा परिषद सदस्य नीतू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, गोपाल दडमल, जे. डी. पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी गणवेशाची चर्चा झाली.
जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो.
गणवेशासाठी लागणारा निधी बघता अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. ते महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निधी मिळालाच नाही. याच कालावधीत शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच शाळेत हजेरी लावावी लागली होती. गणवेशाचा निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान निधी मिळाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची मागणी
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. मात्र काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही. एकाच वर्गात असतानाही मित्राला गणवेश मिळत असताना आपल्याला मिळत नसल्याचे दु:ख चिमुकल्या विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देवून दुजाभाव टाळावा, अशी मागणी आता पालकांनी केली आहे.