विद्यार्थ्यांच्या मदतीला आता ‘झेडपी चांदा स्टुंडट ॲप’, शैक्षणिकसह हेल्थ प्रोफाइलही बघता येणार
By साईनाथ कुचनकार | Published: June 2, 2023 03:20 PM2023-06-02T15:20:43+5:302023-06-02T15:24:22+5:30
गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसह त्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या माध्यमातून विविध शैक्षणिक प्रयोग करता यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ‘झेडपी चांदा स्टुंडट ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसह त्यांना कलागुणांनाही जोपासता येणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक, तसेच हेल्थ प्रोफाइलसुद्धा बघता येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनी या ॲपसाठी सहकार्य केले. या ॲपचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित नुकतेच लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारित करण्यासाठी झेडपी चांदा स्टुटंड ॲप महत्त्वाचे ठरेल, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
या प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय रिपोर्ट कार्डची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून शिक्षकांना पालकसभा घेता येणार आहे. पालकांना त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात सहभाग घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना शेअर करता येणार फोटो आणि माहिती
या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी काढलेले फोटो, तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ, कौशल्य विकसित करण्यासाठी शाळबाह्य उपक्रमाची माहिती शेअर करता येणार आहे. या ॲपमध्ये शैक्षणिक प्रोफाइल, तसेच आरोग्य विभागामार्फत शाळा स्तरावर होणाऱ्या विविध सर्वेक्षणाची माहिती हेल्थ प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
झेडपी चांदा स्टुडंट ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ताच नाही, तर शाळेसंदर्भात माहिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, हेल्थ प्रोफाइल, त्यांच्या आवडीनिवडी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ॲपद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची माहिती उपलब्ध होणार आहे. ॲपच्या माध्यमातून अध्ययन स्तर उंचावण्यात मदत होणार आहे.
- विवेक जॉन्सन, सीईओ, जिल्हा परिषद चंद्रपूर