झेडपी कर्मचाऱ्यांची वाताहत थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:36+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २५ ते ३० वर्षे सेवा करूनही जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या कार्यालयात सेवा केली त्याच कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर येते. असे अनेक प्रकार आजपर्यंत घडले आहे. आता मात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात सर्व लाभांसह त्यांचा सत्कार करण्याचे आदेश सीईओंनी विभागप्रमुखांना दिले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त्यामुळे अनेकांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्ष सेवा करूनही आपली ही अवस्था बघून अनेकांना पश्चाताप सुद्धा होताे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी सीईओ डाॅ. मिताली सेठी यांनी सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठविले असून सेवानिवृत्ती लाभासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा त्याच महिन्याच्या शेवटी सत्कार करण्याचे म्हटले आहे. यामुळे यापुढे तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर लाभ मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम
महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ नुसार कर्मचारी सेवेतून नियत वयोमान सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, कुटूंब निवृत्ती वेतन, वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्ती, सक्तीने सेवानिवृत्ती इ. सर्व प्रकरणे, सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ अदा करणे गरजेचे आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवानिवृत्तीचे दिवशी आर्थिक लाभाचे धनादेश त्याच दिवशी सन्मानपूर्वक वितरित करणे आवश्यक आहे.
दर महिन्याच्या शेवटी होणार सत्कार
- सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकवेळा कर्मचाऱ्यांचा साधा सत्कार केला जात नाही. एवढेच नाही तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ सुद्धा वेळेवर दिल्या जात नाही. त्यामुळे अनेकवेळा कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता वेळेवर लाभ तसेच सेवानिवृत्तीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कारसुद्धा केला जाणार आहे.
उंबरठे झिजवणे होणार बंद
एकदा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन, गटविमा, उपदान, भविष्य निर्वाहनिधी आदी महत्त्वाचे लाभ देण्यास बराच उशीर होताे. त्यामुळे अनेकवेळा चकरा माराव्या लागतात. आता मात्र सीईओंच्या आदेशानंतर किमान कर्मचाऱ्यांच्या चकरा कमी होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे