किराणा दुकानात १ कोटींची कॅश; 'हवाला'च्या डायरीत 'पीएम' एजन्सीचे नाव,करोडो रुपयांच्या नोंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:37 PM2022-04-28T12:37:12+5:302022-04-28T12:37:49+5:30
छाप्यात पोलिसांनी दोन डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : चेलीपुरा भागातील सुरेश राईस किराणा दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 'हवाला'च्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त केले. या दुकानातून मागील अनेक दिवसांपासून हवालामार्फत व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत हवालाच्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने चेलीपुरा भागातील किराणा व्यापारी आशिष रमेशचंद्र साहुजी यांच्या सुरेश राईस किराणा दुकानावर मंगळवारी सायंकाळी छापा मारून १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त केले. या छाप्यात पोलिसांनी दोन डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
'पीएम' नावाच्या एजन्सीसाठी सावजी हे काम करीत होते. मोबाईल फोनवर येणाऱ्या कोडच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे टोपणनाव लिहून पैसे दिले जात होते. तसेच पैसे जमा करण्यात येत होते. या व्यवहाराची अधिकृतपणे कोठेही नोंद करण्यात येत नव्हती. डायरीत होणारी नोंदच अधिकृत होती, असेही पुढे आले आहे. दरम्यान, व्यापारी आशिष सावजी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिसांनी पैसे, डायऱ्यांसह मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून दिले. सावजी यांचा अधिकृतपणे जबाब नोंदवून पोलीस त्याचा सविस्तर अहवाल आयकर विभागाला देतील. त्यानंतर आयकर विभाग नागपूर कार्यालयाच्या परवानगीने जप्त केलेले पैसे बँक खात्यात जमा करतील. त्यानंतर सावजींकडे पैशाच्या स्त्रोंताविषयी चौकशी करतील, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अर्धा टक्का कमिशन
हवालाचा व्यवहार संभाळणाऱ्यांना शक्यतो अर्धा टक्का कमिशन संबंधित व्यवहारावर मिळते, अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सावजी यांनी पोलिसांच्या छाप्याविषयी एजन्सीला कळविल्यानंतर त्यांनी हात वर केल्यामुळे त्यांना धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षेसाठी स्वतंत्र गार्ड
पोलिसांनी हवालाचे पैसे सांभाळण्यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र बंदूकधारी गार्ड लावला असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारातील पैसे आयकर विभागाकडे द्यावे लागतात. त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे.