आणखी एका कॉटन उद्योजकाला १ कोटींचा गंडा, तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा

By सुमित डोळे | Published: July 27, 2024 07:38 PM2024-07-27T19:38:53+5:302024-07-27T19:39:27+5:30

लेजर बुकमध्ये देखील खोट्या नोंदी करून मालच घेतला नसल्याचे सांगितले.

1 Crore extortion to another cotton entrepreneur, crime against two traders from Tamil Nadu | आणखी एका कॉटन उद्योजकाला १ कोटींचा गंडा, तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा

आणखी एका कॉटन उद्योजकाला १ कोटींचा गंडा, तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : मंजित कॉटन कंपनीच्या फसवणुकीनंतर शहरातील आणखी एका कॉटन निर्मिती उद्योजकाला दोन व्यापाऱ्यांनी एकूण १ कोटी ७ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. गुरुवारी याप्रकरणी तामिळनाडूच्या ओम साईराम टेक्साटाईलचा संचालक अभिषेक भारद्वाज व ओम क्लॉथिंगचा वेलुसानी थिलगावथी या दोघांवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपाल त्रिलोकचंद्र अग्रवाल (४८) यांची रिद्धी सिद्धी कॉटेक्स कंपनी असून, रामानुज कॉटन कॉर्पोरेशन व आर. एस. फायबर्स कंपनीचे ते भागीदार आहेत. एप्रिल, २०१८ मध्ये त्यांच्याकडे तामिळनाडूच्या वेलुसानीने कापसाचा धागा (कॉटन यार्न) पुरवण्याची विनंती केली होती. २०१८-१९ दरम्यान अग्रवाल यांच्या कंपनीने त्याला दहा टप्प्यांमध्ये ५० लाख ८५ हजार रुपयांच्या मालाचा पुरवठा केला. त्यापैकी ५ बिलांची रक्कम त्याने दिलीच नाही. पंधरा दिवसांत बिलाची रक्कम न मिळाल्यास १५ टक्के व्याज बिलात देण्याचा करार ठरला होता. मात्र, आरोपी वेलुसानीने पैसे देण्यास नकार दिला. शिवाय, लेजर बुकमध्ये देखील खोट्या नोंदी करून मालच घेतला नसल्याचे सांगितले.

अशाच प्रकारे अग्रवाल यांनी तामिळनाडूच्याच ओमसाई राम टेक्सटाईलच्या भारद्वाजला ३१ लाख ४३ हजारांचा माल पुरवला होता. मात्र, त्याने देखील पैसे देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी मिळून अग्रवाल यांची १ कोटी ७ लाखांची फसवणूक केली. उपनिरीक्षक आत्माराम घुगे तपास करत आहेत.

Web Title: 1 Crore extortion to another cotton entrepreneur, crime against two traders from Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.