कृषी उद्योजकास १ कोटीच्या खंडणीची मागणी, सख्ख्या भावासह तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:23 PM2023-09-29T12:23:57+5:302023-09-29T12:24:10+5:30
गंगापूर तालुक्यातील घटना; आरोपींमध्ये फिर्यादीचा सख्खा भाऊ
गंगापूर: कृषी कंपनी व संचालकांची बदनामी थांबविण्यासाठी कंपनी मालकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये फिर्यादी उद्योजकाच्या सख्ख्या भावाचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार प्रताप वसंतराव सांळुके यांची मांजरी शिवारात दर्जेदार अग्रो सर्व्हिसेस लि. ही कंपनी असून त्यांची व कंपनीची बदनामी थांबविण्यासाठी आरोपी कल्याण साळुंके, राजेंद्र पवार, वाल्मिक सिरसाठ यांनी त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती तसेच पैसे दिले नाही तर कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल करु व सदरील कंपनी जमिनीसह बळकावण्याची धमकी तिघांनी आरोपींनी दिली होती; मात्र तक्रारदार प्रताप साळुंके यांनी आरोपींना समजावून सांगितले तरी त्यांनी न ऐकल्याने नाईलाजाने प्रताप साळुंके यांनी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये दिले. त्यानंतर देखील तिघांनी साळुंखे यांना वारंवार त्रास देऊन उर्वरित ९९ लाखांची मागणी केल्याचा आरोप प्रताप साळुंखे यांनी गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी कल्याण साळुंके, राजेंद्र पवार, वाल्मिक सिरसाठ यांच्या विरोधात सोमवारी रात्री खंडणीसह विविध कलमांन्वये गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन भावांमध्ये अनेक दिवसांपासून वाद
गुन्ह्यातील तीन आरोपीपैकी एक कल्याण साळुंके हा फिर्यादी प्रताप साळुंखे यांचा सख्खा भाऊ आहे. त्यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू असून त्यातून कंपनीला केंद्रबिंदू करून दोन्ही भावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे शीतयुद्ध रंगले होते. त्यातच आता मोठ्या भावाने लहान भावावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.