आकर्षक व्याजाचे आमिष देऊन १ कोटीची फसवणूक; आरोपीस पुण्यात केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:26 PM2021-06-10T12:26:25+5:302021-06-10T12:33:43+5:30
शहरातील २० ते २२ गुंतवणूकदारांना गंडविल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता
औरंगाबाद: कमोडिटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून २२ जणांना एक कोटीला गंडा घालून फरार झालेल्या सूत्रधार आरोपीस पुण्यात वाघोली परिसरातून अटक करण्यात आली.
प्रशांत रमेश धुमाळ (वय ४७, रा. जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे. प्रशांत धुमाळ याच्यासह धुमाळ कुटुंब, दलाल यांनी सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या व्यवस्थापकाला सात लाखांना गंडविल्याचा प्रकार २०१९ मध्ये समोर आला होता. यापूर्वी देखील धुमाळविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर मुख्य सूत्रधार प्रशांत धुमाळ याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे धुमाळ याने आणखी २० ते २२ गुंतवणूकदारांकडून अशाच प्रकारे आमिष दाखवून त्यांचे १ कोटी ८२ लाख रुपये लाटल्याचे उघडकीस आले आहे.
सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीमध्ये अनिलकुमार सुनील जैस्वाल (३०, रा. जाधववाडी) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रशांत धुमाळशी ओळख झाली होती. त्याने जानेवारी २०१४ मध्ये सीटीए (कमोडिटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो, हे पटवून दिले. तसेच गुंतवणुकीवर जैस्वाल यांना दहा टक्के व्याज देणार असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून १ मार्च २०१४ रोजी जैस्वाल यांनी धुमाळच्या सीटीए या व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर ठरल्याप्रमाणे जैस्वाल यांना ३५ हजार रुपयांचा हप्ता काही महिने व्याजाच्या स्वरुपात देण्यात आला. त्यानंतर जैस्वाल यांनी मिळालेले व्याज व रोख अशी सात लाखांची पुन्हा गुंतवणूक केली.
ही गुंतवणूक केल्यावर मात्र, धुमाळ व दलालांनी आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे बँकेच्या खात्यात पैसे नाही. खात्याचे व्यवहार बंद करण्यात आले आहे. अशी वेगवेगळी कारणे पुढे करून पैसे देण्यास नकार दिला. धुमाळने अशाच प्रकारे शहरातील २० ते २२ गुंतवणूकदारांना गंडविल्याचे समोर आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली. त्यारून धुमाळसह पत्नी भावना, सख्खा भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अविनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पूर्णपात्रे यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार दुसऱ्यांदा एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या टीमने केली कारवाई..
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता व पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर, पोलीस अंमलदार नितीश घोडके, संदीप जाधव, महेश उगले, बाबासाहेब भानुसे व नितीन देशमुख यांनी ही कारवाई केली.