पाणी नसल्याने पडीक असलेल्या शेतातून १ कोटीच्या मुरूमाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 07:59 PM2019-05-16T19:59:19+5:302019-05-16T20:02:41+5:30
पोलीस, महसूल विभाग तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही.
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील तळेसमन गावातील गट क्र. ४८ मध्ये आसिफ खान इसाक खान पठाण यांची तीन एकर शेती आहे. शेतीत पाणी नसल्याने मागील काही महिन्यांपासून जमीन पडीक आहे. मागील दोन महिन्यांपासून काही मुरूम माफियांनी आसिफ यांचे संपूर्ण शेत पोखरून तब्बल १ कोटी रुपयांच्या मुरूम चोरी करून नेला. यासंदर्भात त्यांनी पोलीस, महसूल विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. पण कोणीही त्यांच्या तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही.
मागील दीड महिन्यापासून आसिफ खान विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. शहरातील ज्युबिली पार्क येथे राहाणारे आसिफ शेताकडे कधीतरी फेरफटका मारतात. २८ एप्रिल रोजी त्यांनी शेतात पाय ठेवला असता आश्चर्याचा धक्काच बसला. मुरूममाफियांनी त्यांच्या शेतात ३० फूट खोल खड्डा केला. तब्बल १ हजार फुटांपर्यंत हा खड्डा आहे. शेतात दोन विनाक्रमांकाचे पोकलेन, काही हायवा मुरूम भरत असल्याचे निदर्शनास आले.
कोणाच्या परवानगीने मुरूम नेत आहात, असा प्रश्न त्यांनी वाहनचालकांना केला. संबंधितांनी नमूद केले की, आम्ही एका ट्रीपचे दोन हजार रुपये मोहसीन खान, मोफीन खान यांना देत आहोत. त्यांच्यासोबत रीतसर करारही केला आहे. हे उत्तर ऐकून आसिफ यांच्या पायाखालची वाळूच घसरली. मुंबई येथील मकसूद खान यांनी हे काम काही मंडळींना दिल्याचे कळाले. शेतातील संपूर्ण मुरूम धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी नेण्यात येत असल्याचे कळाले.
यानंतर आसिफ यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली. त्याचीही दखल घेण्यात आली नाही. उलट तक्रारदाराला जिवे मारण्याच्या धमक्या भूमाफियांकडून देण्यात येत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विविध निवेदनात केली आहे.