रिकाम्या हाताने परतणाऱ्या ग्राहकाने संशय बळावला;पोलिसांनी छापा टाकून हवालाचे १ कोटी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:45 PM2022-04-27T12:45:10+5:302022-04-27T12:50:24+5:30

सुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर, जीएसटी विभाग तपासणी करणार आहे.

1 crore worth of hawala racket seized from grocery store; Crime Branch raid in Aurangabad | रिकाम्या हाताने परतणाऱ्या ग्राहकाने संशय बळावला;पोलिसांनी छापा टाकून हवालाचे १ कोटी पकडले

रिकाम्या हाताने परतणाऱ्या ग्राहकाने संशय बळावला;पोलिसांनी छापा टाकून हवालाचे १ कोटी पकडले

googlenewsNext

औरंगाबाद : चेलीपुरा भागातील सुरेश राईस दुकानात हवाला रॅकेटच्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात पकडले. या दुकानातूनच शहरातील सर्व हवाल्याचे व्यवहार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

चेलीपुरा भागातील आशिष साहुजी (रा. टी. व्ही. सेंटर) यांचे सुरेश राईस नावाचे दुकान आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास या दुकानातून हवाला रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. तसेच हवालाचे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचेही समजले. त्यावरून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पथकाने छापा मारला. त्यापूर्वी पथकाने दिवसभर दुकानाची रेकी केली. त्यामध्ये अनेकजण आतमध्ये जाऊन कोणताही किराणा खरेदी न करताच परतत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हवालाचा पैसा आल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाल्यावर पोलिसांनी छापा मारला. त्यात दुकानातील ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली. 

दुकानाचे मालक आशिष साहुजी यांना विचारपूस केल्यानंतर पैशाचा स्त्रोत सांगता आला नाही. हवालाचे पैसे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी आयकर, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत पैशाची मोजदाद करण्यास सुरुवात झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये मोजण्यात आले. त्याशिवायही मोठ्या प्रमाणात रकमेचे वाटप करण्यात आल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. 
पकडलेल्या पैशांसह संशयितास गुन्हे शाखेत मध्यरात्री नेल्यानंतर चौकशी केली जाणार होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, विजय निकम, संदीप सानप, राजेंद्र साळुंके, दत्तात्रय गढेकर, वीरेश बने, नितीन देशमुख, चालक शिनगारे यांच्या पथकाने केली.

जीएसटी, आयकर विभाग करणार तपासणी
सुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर, जीएसटी विभाग तपासणी करणार आहे. कोठून पैसे आले, कोठे जाणार आहेत. त्याविषयी माहिती आगामी दोन दिवसांत गोळा केली जाईल.

Web Title: 1 crore worth of hawala racket seized from grocery store; Crime Branch raid in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.