बीएसएनएलच्या निवृत्त अधिकाऱ्याला तोतया अधिकाऱ्याचा १ लाख २१ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:04 AM2021-06-20T04:04:21+5:302021-06-20T04:04:21+5:30
औरंगाबाद: भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तोतया बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली माहिती विचारून आणि ...
औरंगाबाद: भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तोतया बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली माहिती विचारून आणि मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून १ लाख २१ हजार १८ रुपये ऑनलाईन काढून घेतले. १५ जून रोजी रात्री झालेल्या या घटनेविषयी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार रमेश रामराव देशमुख (६७, रा. शिवाजीनगर रोड) हे १५ जून रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांना अनोळखी मोबाईलधारकाने कॉल करून तो बीएसएनएल कस्टमर केअरमधून अधिकारी बोलत असल्याचे त्यांने सांगितले. तुमच्या केवायसी अपडेट करायची असल्याचे तुमचा बँक डिटेल द्या, असे तो म्हणाला. यानंतर त्याने तक्रारदारांना त्यांच्या मोबाईलमधली प्ले स्टोअरवर जाऊन अक्सेस नावाचे ॲप्लिकेशन डाऊन लोड करा असे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार देशमुख यांनी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. या ॲप्लिकेशनवर १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्या बँक खात्यातून त्याच्या १० रुपये पाठविले. यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या एसबीआयच्या वेगवेगळ्या दोन खात्यातून आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून असे एकूण १ लाख २१ हजार १८ रुपये ऑनलाईन काढून घेतले. बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेज त्यांना प्राप्त झाले. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला.