एलपीजी रिक्षामधून १ क्विंटल ११ किलो गांजा जप्त; तीन तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 03:43 PM2021-02-03T15:43:57+5:302021-02-03T15:47:14+5:30
पोलिसांच्या विशेष पथकाला मध्यरात्रीनंतर २.३० ते ३ वाजेच्या सुमारास संशयित रिक्षा आणि दुचाकी सोबत जाताना दिसली.
औरंगाबाद : चोरट्या मार्गाने विक्रीसाठी शहरात आणला जाणारा तब्बल १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम गांजा पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून पकडला. केंब्रिज चौकात रात्री दोन वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तीन तस्करांना अटक करण्यात आली. ऑटो रिक्षा, दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम आणि गांजा, असा तब्बल २५ लाख ८२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेख शोएब शेख मुनीर (वय २०, रा. रहेमानिया कॉलनी), बख्तियार खान जहांगीर खान ऊर्फ राजा आणि शेख शहारुख शेख समद (२३, रा. असेफिया कॉलनी, टाऊन हॉल), अशी आरोपींची नावे आहेत.
एका एलपीजी रिक्षामधून गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्तांना दिली. यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, हवालदार सय्यद शकील, विजय निकम, इमरान पठाण, ए. आर. खरात, मनोज विखणकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा रचला. मध्यरात्रीनंतर २.३० ते ३ वाजेच्या सुमारास संशयित रिक्षा आणि दुचाकी सोबत जाताना दिसली. यानंतर तेथील एका दुकानासमोर संशयित रिक्षा आणि दुचाकी पकडली. तेव्हा पंचांसमक्ष रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये आरोपी शोएब, बख्तियार खान बसलेले दिसले. रिक्षात लपवून ठेवलेला तब्बल १११ किलो ७० ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपी बख्तियारजवळ ३४ हजार ५३० रुपये रोख, १६ हजार ५०० रुपयांचा मोबाइल, शहारुखजवळ १ लाख ८० हजार रुपयांची रिक्षा, ९० हजारांची दुचाकी, ११ हजार ५०० रुपयांचा मोबाइल आणि गांजा, असा एकूण २५ लाख ८२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.