महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६८ कोटी प्राप्त
By मुजीब देवणीकर | Published: February 1, 2024 07:34 PM2024-02-01T19:34:42+5:302024-02-01T19:35:05+5:30
शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने सोमवारी महापालिकेला तब्बल १ हजार ६८ कोटींचा निधी दिला. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही. आतापर्यंत झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी मनपाने शासनाकडे ८११ कोटींची मागणी केली होती. त्या तुलनेत राज्याने २०० कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत केंद्र शासनाचे ३० टक्के, राज्याचे ४५, तर महापालिकेने ३० टक्के वाटा द्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाने मिळून योजनेसाठी आतापर्यंत ७३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला. हा निधी मनपाने त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पाठविला आहे. महापालिकेकडे समांतर पाणी जलवाहिनीचा २०० कोटींचा निधी पडून होता. हा निधीही वापरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महापालिकेने आत्तापर्यंत ९८१ कोटी ६५ लाख रुपये दिले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे ८११ कोटी निधीची मागणी केली होती. प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन ८११ कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सोमवारी महापालिकेला १ हजार ६८ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. महापालिकेने मागणी केली त्यापेक्षा २०० कोटी रुपयांचा निधी जास्त देण्यात आला. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत कामासाठी निधी कमी पडणार नाही.
८२२ कोटी २२ लाखांचा प्रश्न कायम
नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. खंडपीठाने हा वाटा राज्य शासनाने द्यावा, असे आदेशित केले आहे. ८२२ कोटींचा निधी देण्यासंदर्भात राज्य शासनाने अद्याप हमी दिलेली नाही. सोमवारी मागणीपेक्षा २०० कोटी रुपये जास्तीचे देण्यात आल्यामुळे शासन महापालिकेच्या वाट्याचा निधी देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.