१० लाखाची साखर घेऊन जाणारा ट्रक गायब; चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:08 PM2020-02-28T12:08:04+5:302020-02-28T12:09:41+5:30
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
कन्नड - येथील साखर कारखान्यातुन गुजरातकडे १० लाख रुपये किमतीची साखर घेऊन निघालेला ट्रक नियोजित ठिकाणी पोहोचलाच नाही. त्यामुळे ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी रोजी बारामती अॅग्रो युनिट २ या साखर कारखान्यातुन एम ३० साखरेची २५० क्विंटल वजन असलेली पाऊच ट्रक ( क्र.सीजी-०४ जेडी -९८४४ ) मध्ये भरण्यात आली. ही साखर गुजरात येथील रिलायन्स रिटेल लिमीटेड येथे रवाना करण्यात आली. सदर ट्रक दि. १७ फेब्रुवारी रोजी नियोजित स्थळी पोहोचणे आवश्यक होते. तथापी ट्रक नियोजित स्थळी पोहोचलाच नाही. उलट दि. १७ पासून ट्रक मालक प्रितपालसिंग पंजारत व ट्रकचालक नरेंद्र यादव दोघे ( रा. रायपुर, छत्तीसगड ) यांचे मोबाईल बंद आहेत.
यामुळे ट्रान्स्पोर्ट मालक ओंकारसिंग तारासिंग पन्नु ( रा. उस्मानपुरा, औरंगाबाद ) यांनी आरोपी ट्रक मालक प्रितपाल सिंग पंजारत व ट्रकचालक नरेंद्र यादव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि. रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनि. बलभीम राऊत करीत आहेत.