एसटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या खासगी बसच्या चालकाला १ वर्षाची कैद, २० हजार दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:02 IST2024-10-23T18:02:27+5:302024-10-23T18:02:35+5:30
रस्त्यात बस आली असता लाकडी दांडा डोक्यात घातला

एसटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या खासगी बसच्या चालकाला १ वर्षाची कैद, २० हजार दंड
वाळूज महानगर : दीड वर्षापूर्वी एसटी महामंडळाच्या बसचालकास मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एका खासगी बसचालकास वैजापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाची साधी कैद व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
एसटी महामंडळाच्या गंगापूर आगारातील बसचालक केसरलाल कोंडीराम शेलार (रा. तिसगाव) व वाहक आबासाहेब ठोंबरे दीड वर्षापूर्वी बस (एमएच २०, बीएल १०८७) मध्ये प्रवासी भरुन गंगापूर येथून लासूर स्टेशनमार्गे शहरात चालले होते. आंबेलोहळ येथून विटावा गावाजवळ सायंकाळी ४ वाजता समोरून खासगी बस (एमएच १४ सीडब्ल्यु ४४८३) आल्याने एसटी चालक केसरलाल शेलार यांनी बस बाजूला उभी केली. मात्र, खासगी बसचा चालक मनोज रशीद शहा (रा. विटावा) याने एसटी चालक शेलार यांच्याशी वाद घालत त्यांना बस मागे घेण्यास सांगितले. या वादावादीत संतप्त झालेल्या शहाने शेलार यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडा डोक्यात मारून जखमी केले. यावेळी बसमधील प्रवासी व वाहक आबासाहेब ठोंबरे यांनी मध्यस्थी करुन जखमी चालक शेलार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी गुन्ह्याचा तपास करुन वैजापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने मनोज शहा यास दोषी ठरवत एक वर्षाची साधी कैद व २० हजार दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. गजानन मांझा यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार दत्ता गवळी यांनी मदत केली.