संकटग्रस्त बालकांसाठी ‘१०९८’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:16 AM2018-06-13T00:16:57+5:302018-06-13T00:20:30+5:30
कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.
जन्माला आलेल्या, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे; मात्र आपल्या समाजात बालकांच्या प्रश्नाकडे आजही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक बालकांना घरातच अत्याचार सहन करावा लागत आहे. काही बाळांना भूल देऊन भिकारी त्यांचा भावनिक वापर करून घेत आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांच्याही समस्या आहेत. अनेकदा मूल घरचा रस्ता विसरतात, हरवतात. संकटात सापडतात, कोण्या बालकाचा अपघात झाला आहे, अशा संकटाच्या वेळी त्या संकटग्रस्त बालकांनी किंवा पालक, नातेवाईक वा घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कोणीही १०९८ या नंबरवर फोन केला, तर त्या मुलाला त्वरित मदत मिळू शकते. यासाठी जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईनची सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात चाईल्ड लाईन सुरू करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र समन्वयक, समुपदेशक, सदस्य, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
मागील ११ मेपासून चाईल्ड लाईनची सुरुवात झाली असून, दररोज जिल्ह्यातून ४० ते ५० कॉल्स येत असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी दिली.
२४ तास सुरू चाईल्ड हेल्पलाईन
० ते १८ वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असते. काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाºया मुलांसाठीही संस्था काम करते. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संस्थेतर्फे तातडीने मदत पुरविण्यात येते. महिला आणि बालविकास या केंद्रीय मंत्रालयाचा चाईल्ड लाईनला आधार आहे. चाईल्ड लाईन हे राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेली असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांनी दिली.
शाळांमधून करणार जनजागृती
एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनचे कार्य व १०९८ हा टोल फ्री फोननंबरची माहिती देण्यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे.