इलेक्ट्रिकल वाहनांसाठी शहरात १० चार्जिंग स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:02 AM2021-02-13T04:02:06+5:302021-02-13T04:02:06+5:30
औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ...
औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरात १० ठिकाणी स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत महापालिकेची चर्चा झाल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठी देशात विविध शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. देशातील किमान प्रमुख २५ शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी केली जात आहे. राजधानी दिल्लीत प्रत्येक तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. महाराष्ट्रात ठाणे शहरात शुक्रवारी ऑटो रिक्षांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाले. या पार्श्वभूमीवरच पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिकल वाहनांसाठी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.
टाटा कंपनीने दिली सहमती
शहरात दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात नुकतीच टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी हा प्रकल्प औरंगाबाद शहरात राबविण्यास सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित कंपनी व पालिका यांच्यात सामंजस्य करार होईल.
आस्तिक कुमार पांडेय, प्रशासक, महापालिका.
दहा ठिकाणी जागेचा शोध सुरू
शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यापासून पहिले तीन महिने शहरवासीयांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा ठिकाणी हे स्टेशन उभारण्यासाठी जागांची निवडही लवकरच केली जाणार आहे.