नवीन हॉस्पिटलसाठी १० कोटीचे कर्ज देतो; आमिषाला बळी पडून डॉक्टरने गमावले ११ लाख
By राम शिनगारे | Published: April 7, 2023 06:11 PM2023-04-07T18:11:08+5:302023-04-07T18:11:32+5:30
नवीन हॉस्पीटल बांधण्यासाठी हवे होते कर्ज : क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : नवीन हॉस्पीटल उभारणीसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून मिळून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टराला ११ लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मिळवून देण्यासाठी दिलेल्या ११ लाख रुपयांचा धनादेश बाऊंन्स झाल्यानंतर डॉक्टरने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेत फसवणूकीचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
गजानन अरविंद कुलकर्णी असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. डॉ. सुनील अशोकराव साळुंके (रा. छत्रपतीनगर, मल्हार चौकाजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना स्वत:चे नवीन हॉस्पीटल सुरू करायचे हाेते. त्यासाठी पैशाची आवश्यता होती. त्याविषयी डॉ. साळुंके यांनी बालपणीचा मित्र जयेश कुलकर्णी याच्यासोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी गजानन कुलकर्णी एजंट म्हणून काम करतो. त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ३ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. साळुंके हे गजानन कुलकर्णी यास निराला बाजार परिसरात भेटले. त्याठिकाणी दोघांची चर्चा झाली.
१० कोटी रुपये बँक लोन ५ टक्के व्याजदराने मंजुर करून देतो. त्यासाठी ४ टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार लेखी करार झाला.कमिनशनची ॲडव्हान्स रक्कम म्हणून ११ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार डॉक्टरने १ लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यात जमा केले. उर्वरित १० लाख रुपये विविध तारखेला ऑनलाईन बँक खात्यात जमा केले. गजानन कुलकर्णी याने ४५ दिवसांमध्ये कर्ज मंजुर करून देण्याचा करार केला होता. या कराराची मुदंत संपल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. भेटण्याचे टाळले. त्यामुळे डॉ. साळुंके यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेत गजानन कुलकर्णी याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला.
धनादेशावर केली बनावट स्वाक्षरी
डॉ. साळुंके यांनी ११ लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ लाख रुपयांचा ॲक्सीस बँकेचे धनादेश दिला. हा धनादेश बँकेत टाकल्यानंतर त्यावर केलेली स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे धानदेश वटला नाही. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक पुजारी करीत आहेत.