धक्कादायक! कागदावरही नसलेले ७३ रस्ते दाखवून अभियंत्यांनीच लाटले १० कोटी

By राम शिनगारे | Published: April 14, 2023 08:35 PM2023-04-14T20:35:32+5:302023-04-14T20:37:16+5:30

सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल : कुशल रोजगार हमी योजनेतील धक्कादायक अपहार उघड

10 crores corruption by showing 73 roads which are not even on paper, the engineers themselves | धक्कादायक! कागदावरही नसलेले ७३ रस्ते दाखवून अभियंत्यांनीच लाटले १० कोटी

धक्कादायक! कागदावरही नसलेले ७३ रस्ते दाखवून अभियंत्यांनीच लाटले १० कोटी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : चक्क कागदावरही काम केले नसलेल्या सिल्लोड, फुलंब्री तालुक्यातील ७३ रस्त्यांचे बनावट देयके तयार करून शासकीय कोषागारातुन १० कोटी ७ लाख रुपयांची रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १० कोटी रुपये लाटणाऱ्या सहा अभियंत्यांच्या विरोधात सीटीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे नायब तहसीलदारांनी नोंदवले आहेत.

आरोपींमध्ये सार्वजनिक बांधकामच्या सिल्लोड उपविभागाचे शाखा अभियंता के.एस. गाडेकर, उपविभागीय अभियंता एम.एम. कोल्हे, शाखा अभियंता बी.बी. जायभाये, आर.जी. दिवेकर, ए.एफ. राजपुत (सेवानिवृत्त) आणि नागदिवे यांचा समावेश आहे. रोजगार हमी योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात २००९ ते २०१६ या कालावधीत विविध गावांमध्ये कुशल रोजगार हमी योजना अंतर्गत एकुण ४२ रस्त्यांची ५ कोटी ५० लाख ४६ हजार रुपयांची आणि सिल्लोड तालुक्यात ३१ रस्त्यांची ४ कोटी ५६ लाख ५४ हजार रुपये अशी एकुण १० कोटी ७ लाख रुपयांची कामे न करता बनावट देयके तयार करून शासकीय कोषागारातुन रक्कम आरोपींनी काढली. कोषागारातुन बनावट देयकानुसार काढलेल्या १० कोटी ७ लाख रुपयांची कोणतेही कागदपत्रे दक्षता समितीच्या चौकशीत आढळुन आली नाहीत. त्याविषयीची अहवाल दक्षता समितीने जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांना सादर केला होता.

या कामांची चौकशी करताना आरोपी अभियंत्यांनी दक्षता समितीला बिल काढलेल्या कामाचा अभिलेखही उपलब्ध करून दिला नाही. तेव्हा समितीने संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या. त्या नोटिसांनीही समाधानकारक उत्तरेही दिली नाही. त्यामुळे संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची शिफारस दक्षता समितीने केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सहा जणांच्या विरोधात फसवणूकीचे गुन्हे नोंदविण्याचे लेखी आदेश नायब तहसीलदारांना दिले. त्यानुसार सीटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दादाराव शिनगारे करीत आहेत.

Web Title: 10 crores corruption by showing 73 roads which are not even on paper, the engineers themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.