नाथसागरात दोन दिवसांत दुर्मिळ १० विदेशी पक्ष्यांचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:54 PM2019-02-19T13:54:03+5:302019-02-19T13:57:31+5:30
युरोप व सायबेरियातून जायकवाडी जलाशयावर आलेल्या या पक्ष्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.
पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या जलाशयात गेल्या दोन दिवसांत दहा विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे मरण पावलेले विदेशी पक्षी शेड्यूल ए प्रवर्गातील असून, लोप पावणाऱ्या प्रवर्गातील आहेत. युरोप व सायबेरियातून जायकवाडी जलाशयावर आलेल्या या पक्ष्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.
जायकवाडी धरणाचे जलाशय जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने पक्षी या जलाशयावर मुक्कामी असतात. रविवारी दुपारी टफ्टेड पोचार्ड, शेंडी बदक, कॉमन पोचार्ड, शॉवेलियर जातीचे सात विदेशी पक्षी मृतावस्थेत जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजाच्या परिसरात आढळून आले. सदरील पक्ष्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. हे मृतदेह पक्षीमित्र दिलीप भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याबाहेर काढले व वन्यजीव विभागाच्या ताब्यात दिले. सोमवारी पुन्हा काही पक्षी मरण पावलेले आढळून आले. या पक्ष्यांनाही पक्षीमित्र दिलीप भगत यांनी पाण्याबाहेर काढले.
दरम्यान, वन्यजीव विभागाचे भगवान परदेशी (नेवासा) यांनी पंचनामा करून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांना सादर केला. रविवारी सुटी असल्याने पैठण येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते व पक्ष्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने या पक्ष्यांचे मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी सांगितले. पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याची मागणी पक्षीप्रेमींमधून होत आहे.
शेड्यूल ए मधील पक्षी
जलाशयात मरण पावलेले पक्षी शेड्यूल ए प्रवर्गातील आहेत. लोप पावणाऱ्या प्रवर्गात या पक्ष्यांचा समावेश असल्याने त्यांच्या मृत्यूची घटना धक्कादायक असल्याचे पक्षीमित्र दिलीप भगत यांनी सांगितले. नाथसागर जलाशयात विदेशी पक्षी मरण पावल्याची ही पहिलीच घटना आहे.