आठवडी बाजारात १० मोबाईल चोरीस
By Admin | Published: June 2, 2014 12:28 AM2014-06-02T00:28:21+5:302014-06-02T00:54:21+5:30
जालना : जुना जालन्यातील आठवडी बाजारात मोबाईल चोर अवतरले असून रविवारी दहा हॅण्डसेट चोरीस गेल्याची घटना घडली.
जालना : जुना जालन्यातील आठवडी बाजारात मोबाईल चोर अवतरले असून रविवारी दहा हॅण्डसेट चोरीस गेल्याची घटना घडली. यापैकी नऊ जणांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जालन्याचा आठवडी बाजाराचा दिवस म्हणून मंगळवार सर्वांना परिचित आहे. मात्र नजीकच्या काळात नवीन जालना भागात बुधवार व रविवारी जुना जालन्यात भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. गेल्या वर्षभरापासून मोबाईल चोरीच्या अनेक घटना या बाजारात घडल्या आहेत. पोलिस यंत्रणेसाठी हे मोठे आव्हान ठरल्यानंतरही चोरटे पोलिसांना भारी ठरले आहेत. पकडण्यात आलेल्या चोरट्यांवर कारवाई केल्यानंतरही पुन्हा दुसर्या आठवड्यात चोरीच्या घटना घडत आहेत. हे आव्हान पेलण्यास पोलिसांना अपयश आले आहे. जुना जालना भागातील आठवडी बाजार गांधी चमन ते रेल्वेस्थानक मार्गावर भरतो. सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत या मार्गावर प्रचंड गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे अनेक ग्राहकांचे मोबाईल चोरत आहेत. गर्दीमुळे धक्काबुक्कीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे मोबाईल चोरीस गेल्याचेही जाणवत नाही. त्यासाठी पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक वळविण्याची गरज आहे. वाहतूक वळविली जात असल्याची सवय लागली तर वाहनधारकच या मार्गावरून जाणार नाहीत. मात्र शहर वाहतूक शाखेला केवळ पुढाकार घेण्याची गरज आहे. शिवाय कदीम जालना व सदर बाजार पोलिस ठाण्याकडून बंदोबस्तही दिला जात नाही. (प्रतिनिधी)