१० पेटंट जाहीर, ५ वेटिंगवर; विद्यापीठातील संशोधक आता इटलीत करणार पोस्ट डॉक्टरल संशोधन
By राम शिनगारे | Published: November 3, 2023 04:10 PM2023-11-03T16:10:04+5:302023-11-03T16:15:02+5:30
फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बोझेन बोल्झानो येथे पोस्ट डॉक्टरलसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विषयात पीएच.डी.चे संशोधन करतानाच विविध देशांचे १० पेटंट मिळविणारे यंग सायंटिस्ट डॉ. सुमेघ श्रीकांतप्रसाद थारेवाल यांची आता इटली सरकारच्या ‘फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बोझेन बोल्झानो’मध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी निवड झाली आहे. तेथील सरकार राबवित असलेल्या 'रोबोट असिस्टेड असेम्बलिंग अँड डिसअसेम्बलिंग टु फॅसिलिटेट द रिमॅनुफॅक्टयरिंग अँड रियुज ऑफ प्रॉडक्ट्स (रेमॅन्युफॅक्चरिंग) स्ट्रँकचर्ड रिप्रेसेंटेशन लर्निंग फॉर व्हिजन' या प्रकल्पावर संशोधन करणार आहेत. त्यासाठी इटली सरकारने वर्षभरासाठी ४२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.
डॉ. सुमेघ थारेवाल हे छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात राहतात. त्यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन असून, वडील शेतकरी आहेत. शालेय शिक्षण भोकदरनला झाल्यानंतर बी.एस्सी. सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाली. एम.एस्सी. संगणकशास्त्र एमजीएम विद्यापीठात पूर्ण केल्यानंतर लाेणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.व्ही. काळे यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशाेधन पूर्ण केले. त्यानंतर मणिपाल विद्यापीठ जयपूर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी पुणे, सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, विवेकानंद महाविद्यालयात विविध संशोधन प्रकल्पावर काम करीत अध्यापनाचेही कार्य केले. मागील महिन्यात त्यांची निवड इटलीतील विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी झाली आहे.
कशावर होणार संशोधन
पुनर्निर्मितीसाठी असेम्बलिंग आणि डिसअसेम्बलिंगचे पूर्ण ऑटोमेशन साध्य करणे कठीण आहे. त्यामुळे वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे रोबोटच्या साहाय्याने वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर झाला पाहिजे. त्यासाठीची प्रणाली एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्याचे संशोधन डॉ. थारेवाल करणार आहेत. त्यातून मानवी परिश्रमही कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१० पेटंट जाहीर, ५ वेटिंगवर
डॉ. सुमेघ थारेवाल यांनी केलेल्या संशोधनाला १० पेटंट मिळाले आहेत. त्यात भारत सरकारचे १, ऑस्ट्रेलियन सरकारचे ५, जर्मनीचे २, युके १ आणि दक्षिण आफ्रिका सरकारकडून १ पेटंट जाहीर झाले आहे. या पेटंटमध्ये इतरही सहकारी सोबतीला आहेत. त्याशिवाय भारत सरकारकडे ५ संशोधन पेटंटसाठी दाखल केले आहेत. त्यांची घोषणा होणे बाकी असल्याची माहिती डॉ. थारेवाल यांनी इटलीतून 'लोकमत'शी बोलताना दिली. त्याशिवाय ४७ संशोधन पेपर, ५ ग्रंथ प्रकाशित. गुगल स्कॉलरचे सायटेशन ३००, एच-इंडेक्स ११, आय १०- इंडेक्स ११ असल्याचेही त्यांनी सांगितले.